मालवण :
पूज्य साने गुरुजींच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जन्मवर्षानिमित्त कथामाला मालवण शाखेतर्फे दिला जाणारा विशेष सेवामयी कर्मचारी पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरेचे प्रमुख रोखापाल श्री. महेश विष्णू कोळंबकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सदर सोहळा प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी आचरे येथे संपन्न झाला अध्यक्षस्थानी प्राध्यापक श्री. नागेश कदम तर प्रमुख मान्यवर म्हणून श्री. सागर नाईक, बँक ऑफ महाराष्ट्र झोनल ऑफिसर रत्नागिरी, सदानंद कांबळे, सीलंबू अरुमुगल शाखाधिकारी, अनिता पाटील, तुकाराम पडवळ उपस्थित होते.
सागर नाईक यांच्या हस्ते कोळंबकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला. तर सन्मानचिन्ह व मानपत्र सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कथामाला मालवण यांनी प्रदान केले. कोळंबकर यांच्या पत्नी सौ. आशा महेश कोळंबकर यांना शाल व सन्मानचिन्ह देऊन सुगंधा केदार गुरव यांनी सन्मानित केले. यावेळी बोलताना सागर नाईक म्हणाले, “आज माझ्या हस्ते माझ्या कर्मचाऱ्याचा जो सत्कार होत आहे, त्यामुळे मला फार आनंद झालेला आहे. कोळंबकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे येथे केलेल्या सेवेची पोचपावती कथामालेने दिली, त्याबद्दल मी कथामालेचा आभारी आहे. तुमच्या गावात असलेली शाखा ही तुमचीच आहे व तुमचीच राहणार. कर्मचारी येतील आणि जातील. दोघांनी एकमेकांच्या सहकार्याने बँक प्रत्येकाच्या हृदयात पोहोचवावी.”
सत्काराला उत्तर देताना कोळंबकर म्हणाले, “गेली पंधरा वर्षे मी आचरे शाखेत माझे घर समजून सेवा केली. लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हेच माझे पुरस्कार आहेत. आज कथामालेने जो माझा सत्कार केला, त्याबद्दल मी साने गुरुजी कथामाला परिवाराचा ऋणी आहे.”
यावेळी लक्ष्मणराव आचरेकर, बाबाजी भिसळे, प्रकाश पेडणेकर, सुरेश गावकर, गोविंद गावकर, परशुराम गुरव, श्रुती गोगटे, सायली परब, सुरेंद्र सकपाळ, संजय परब, श्रावणी प्रभू, नितीन प्रभू, मनाली फाटक, कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर, तेजल ताम्हणकर, अमृता मांजरेकर, रावजी तावडे, अनिरुद्ध आचरेकर, भवन मांजरेकर, भावना मुणगेकर आधी कथा मला कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रामचंद्र कुबल यांनी केले तर सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले.