*जागतिक साहित्य कला व्यक्तीत विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मागणे*
मागणे हे दिव्य आहे क्षुद्र ही ते मागणे
मागती त्यांना कसे मी काय मागा सांगणे ।।१।।
मागणे नाहीच देवा फक्त आहे सांगणे
माणसांना समज नाही मागतांना मागणे ।।२।।
देवळाच्या पायथ्याशी बैसतो मागावया
वा घरोघर जावुनी हो फक्त त्याचे मागणे ।।३।।
जे हवे ते स्वस्त सगळे माणसांना ते हवे
कर्म शून्य फक्त द्या हो हेच आहे सांगणे ।।४।।
पुत्रप्राप्ती फार पैसा नोकरी वा छोकरी
दुःख सांगुन ओंजळीला पूर्ण का ती पाहणे ।।५।।
का म्हणावे नृप तयाला वा जगाचा भरवता
शोभते का पोसणार्या सर्व माफी मागणे ।।६।।
आवळा देवून सारे भोपळा काढावया
जनमतांची भीक नेत्या शोभते का मागणे ।।७।।
रंक राहो वा नरपति फक्त जो तो मागतो
चातुर्वर्णी दिव्य होती क्षुद्र यांचे वागणे ।।८।।
पातकी मी पापनाशी देव आहे या जगी
सांगतो मी दिव्य हेचि ” तुज हवे ते वर्तणे” ।।९।।
*(आद्यशंकराचार्यांच्या देव्यपराधक्षमापन स्तोत्रातील श्लोकांश)*
या जगा परमेश्वराने दान द्यावे सांगणे
म्हणुन झाले माऊलीचे “दान” दैवी मागणे ।।१०।।
*(ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान)*
मागती सारेच येथे राखती मोठेपणा
लोकशाही वल्गकी अन् याचकांची याचने ।।११।।
माकडांनी जिंकली ती स्वर्णलंका पाशवी
राम नाही आज केवळ मर्कटी आवर्तने ।।१२।।
वल्गकी=नर्तकी , नरपति=राजा.
*©सर्वस्पर्शी*
कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख नाशिक ४२२०११
मो ९८२३२१९५५०