*मनस्पर्शी साहित्य परिवार सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भूक…*
चंद्र आणि तारका यांची
भूल कुणा पडली
दुनियेमध्ये ज्यांची ज्यांची
पोटे हो भरली
चंद्र पाहता आठवे भाकरी
अशी कशी चांदरात
झोपलीत चिलीपिली उपाशी
चंद्रमौळी घरात
भूक लागता आई दाखवी
पूर्ण गोल चांदवा
कुशीत येउनी झोप जरासा
झोंबे हा गारवा
आज झोपली ती उपाशी
परि स्वप्न उद्याचे नयनी
चंद्रालाही लाज यावी
व्याकूळ आज धरणी
लाज वाटता चंद्र लपवी
ढगाआड चेहरा
स्वप्नामध्ये मुले पाहती
चंद्र भाकरीत हसरा
हलकेच उतरुनी जाई चंद्रमा
झोपडीत पिलांपाशी
हात फिरवी मायेने तो
अन् राही बसून उशाशी
@अरुणा गर्जे
नांदेड