You are currently viewing मालवण-पुणे-निगडी एस.टी.बस अचानक रद्द…

मालवण-पुणे-निगडी एस.टी.बस अचानक रद्द…

मालवण-पुणे-निगडी एस.टी.बस अचानक रद्द…

प्रवाशांनी विचारला एस.टी. अधिकाऱ्यांना जाब…

कणकवली

मालवण ते पुणे-निगडी जाणारी बस अचानक रद्द करण्यात आली आहे. त्‍याबाबत प्रवाशांना कोणतीही कल्‍पना देण्यात आलेली नाही. पुणे येथे जाण्यासाठी कणकवली स्थानकात आलेल्‍या प्रवाशांचा ही बाब लक्षात येताच या प्रवाशांनी एस.टी.अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र संताप व्यक्‍त केला.

लांब पल्‍ल्‍याचा प्रवास सुखकर होण्यासाठी कणकवलीतील अनेक प्रवाशांनी आज १७ ऑक्‍टोबरचे मालवण-पुणे निगडी या बसचे ऑनलाईन आरक्षण केले होते. कणकवली स्थानकात सकाळी ६.३५ वाजता ही बस दाखल होते. मात्र सकाळी सात वाजले तरी ही बस स्थानकात आली नसल्‍याने प्रवाशांनी वाहतूक नियंत्रकांशी संपर्क साधला. त्‍यावेळी मागील सहा दिवसांपासून ही बस फेरी रद्द करण्यात आल्‍याची माहिती देण्यात आली. त्‍यावेळी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्‍त केला.

पुणे प्रवासासाठी निघालेल्‍या जिल्‍हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कामत यांनी वाहतूक नियंत्रक श्री.जाधव यांच्या पुढे प्रश्‍नांची सरबत्ती केली. तर श्री.जाधव यांनी वरिष्‍ठांशी संपर्क साधून बुकिंग केलेल्‍या प्रवाशांना त्‍यांचे पैसे परत केले जातील अशी ग्‍वाही दिली. केवळ आम्‍हाला फक्‍त तिकीट बुकिंगचे पैसे देऊन चालणार नाहीत तर पुणे पर्यंत जाणाऱ्या खासगी आराम बसचे भाडे द्या अशी मागणी प्रज्ञा ढवण यांनी केली. तसेच बस रद्द झाल्‍याबाबत प्रवाशांना कोणतीही पूर्व कल्‍पना दिली जात नसल्‍याबाबत तीव्र संताप व्यक्‍त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा