You are currently viewing दिपक केसरकर यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार कोण..?

दिपक केसरकर यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार कोण..?

संपादकीय….

*दिपक केसरकर यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार कोण..?*

*सावंतवाडी विधानसभा मतदार संघ*

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आधीपासूनच गुढग्याला बाशिंग बांधून असणाऱ्यांनी डोक्याला बाशिंग बांधण्याची तयारी सुरू केली. सावंतवाडी मतदारसंघात देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून डझनभर इच्छुक उमेदवारांची चलबिचल सुरू झाली असून प्रत्येक जण आपापल्या परीने पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी खटाटोप करत आहेत. सावंतवाडी मतदारसंघ हा गेली पंधरा वर्षे नाम. दिपक केसरकर यांच्या अधिपत्याखाली राहिला असून आजही लोक कितीही काहीही बोलले तरी, मतदारसंघातील सुजाण नागरिक दिपक केसरकर यांच्याच पाठीशी असतील अशी चर्चा घडताना दिसत आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच दिपक केसरकर यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार कोण..? असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला आहे.
महविकास आघाडीतील घटक पक्षांच्या सर्व्हे मध्ये महाविकास आघाडीला केसरकर यांच्या विरोधात प्रबळ उमेदवारच मिळत नसल्याचे समजत असून उबाठाचे नेते माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा कल राजन तेलींना उबाठा मधून उमेदवारी देऊन दिपक केसरकर यांना शह देण्याचा विचार करून तसा पक्षश्रेष्ठींकडे त्यांचा आग्रह देखील आहे. त्यामुळे दिपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली उमेदवार असतील का..? असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे.
परंतु सावंतवाडी हा पूर्वीचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. माजी मंत्री प्रवीण भोसले, दीपक केसरकर यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. पण केसरकरांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर सावंतवाडी एक दशकभर शिवसेनेच्या ताब्यात आहे. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेकडे हा मतदारसंघ असून जर शिवसेनेला पुन्हा सत्ता स्थापन करायची असेल तर भाजपची खंबीर साथ मिळणे आवश्यक आहे. कारण सावंतवाडी मतदारसंघात बाळासाहेबांना मानणारी मूळ शिवसेनेची जवळपास चाळीस हजार मते असून त्यापैकी किती मतदान दोन्ही शिवसेनेकडे विभागले जाते यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.
केसरकरांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पवार कुटुंबियांच्या निकटवर्तीय आणि सावंतवाडीच्या सुकन्या मावळ मतदारसंघातून पक्ष वाढीसाठी सिंधुदुर्गात आलेल्या सौ. अर्चना घारे परब यांनी शरद पवार गटात खंबीर पणे राहत सावंतवाडीवर आपला दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी गेले काही महिने मतदारसंघात मतदार जागृतीसाठी मोहीम हाती घेत घरोघरी पोचल्या आहेत. अनेक महिला बचत गटांशी संधान साधून महिला असल्याने महिला वर्गाला खुश करण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील महिलावर्ग त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र समोर येत होते. परंतु महायुतीचे मुख्यमंत्री शिंदेंनी लाडकी बहिण योजना आणून महाराष्ट्रातील महिला वर्गाला महिना १५००/- रुपये प्रमाणे पैसे वाटप करून महिलांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले आणि त्यात ते बहुतांशी सफल झाले असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. अनेक निराधार, गरीब, होतकरू महिलांना त्यांच्या खात्यात आतापर्यंत पाच साडेपाच हजार रुपये आल्याने कित्येक स्त्रियांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा फायदा शिंदे सरकारला होण्याची शक्यता असल्याने दिपक केसरकर यांच्या साठी ही एक जमेची आणि भक्कम बाजू म्हणून समोर येत आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातून गुढग्याला बाशिंग बांधून असणाऱ्यांनी दिपक केसरकर यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.
सावंतवाडी मतदारसंघाचा इतिहास महिलेच्या पाठीशी राहिल्याचा पहावयास मिळत नाही. सावंतवाडीच्या राणीसाहेब देखील निवडणुकीत रणांगणात उतरलेल्या होत्या परंतु त्यांना देखील त्यावेळी दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. सौ.अर्चना घारे परब यांनी मोठी मजल मारून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. परंतु महाविकास आघाडीतील एकी कधीपर्यंत टिकते यावर देखील बरीच गणिते अवलंबून असून राष्ट्रवादीचा उमेदवार सावंतवाडीतून उभा राहिल्यास उबाठा शिवसेनेचे शिवसैनिक किती मदत करतील हे देखील पहावे लागेल. ऊबाठा सेनेचे लोकप्रतिनिधी राजन तेली यांचे आपल्या पक्षात स्वागत करण्यास उत्सुक असून त्यांना आपल्या पक्षातून दिपक केसरकर यांच्या विरोधात उभे करण्याच्या प्रयत्नात असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी देखील होऊ शकते. त्यामुळे आजच्या घडीला केसरकर विरुद्ध राजन तेली अशीच लढत होईल अशी चर्चा रंगत आहे.
दुसरीकडे राजन तेलीही आपलं पहिलं प्राधान्य आपला पक्ष असं म्हणत आहेत. पण एका रात्रीत तीन पक्षांचा प्रवास करणाऱ्या राजन तेलींच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा..? असा प्रश्न कित्येकांच्या मनात येत आहे. निवडणुकी बाबत आपल्या समर्थक सहकाऱ्यांचे मत आजमावण्यासाठी आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांची राजन तेली यांनी “तक्ष” या आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे बहुतांश मोठे नेते, पदाधिकारी यांनी पाठ फिरवली होती. तर काही दुसऱ्या तिसऱ्या फळीतील निवडक कार्यकर्त्यांनी तेली यांच्या बैठकीत सामील होत त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगताना “ज्या वावड्या उठत आहेत तशी भूमिका आपण घेऊ नये” असे मत मांडले होते. त्यामुळे पक्षातील जी नेते मंडळी भाजपाचे नेते म्हणून त्यांच्या बैठकीत सामील झालेली ते, तेलींनी उबाठाशी जवळीक साधल्यास त्यांच्या मागे राहतील का..? हा देखील प्रश्न आहे. या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी पक्षाने आपला उमेदवार द्यावा, आम्हाला दुसऱ्याच्या मागे फिरायला लावू नये अशी मागणी केली. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेल्यास इतर ठिकाणी भाजपा उमेदवाराला शिंदेंच्या माणसांचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.त्यामुळे सावंतवाडी ही काही स्पेशल केस नसल्याने पक्षासाठी प्रत्येकाला काम करावेच लागणार आहे.
या संपूर्ण घडामोडीत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे मास्टरमाईंड रवींद्र चव्हाण यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. “जो नावडे राणेंना तोची आवडे चव्हाणांना” अशी काहीशी स्थिती भाजपाच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे. राजन तेली, विशाल परब हे दोघेही सावंतवाडी विधानसभेसाठी इच्छुक असून एकवेळ निलेश राणे हे आपल्याला भाऊ मानतात असे म्हणणारे विशाल परब आणि राणेंचा उजवा हात समजले जाणारे राजन तेली दोघेही राणेंचे नाव घेत नाहीत पण रवींद्र चव्हाण यांचे गोडवे गातात, त्यांच्या नावाचा जप करत असतात. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा छुपा पाठिंबा दोघांनाही असू शकतो,परंतु राणेंची मेहरनजर त्यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या केसरकरांवर झाली तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही.
आजही जिल्ह्यात राणेंना मानणारे कार्यकर्ते आणि मतदार आहेत. त्यामुळे राणेंनी केसरकरांना मदत केल्यास दिपक केसरकर यांच्यासाठी ही निवडणूक सोपी होईल यात शंकाच नाही.
भाजपा युवा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपली वर्णी लावण्यात यशस्वी झालेले विशाल परब यांनी मागे वळून न पहाता मतदारसंघात भाजपचा प्रचार सुरू केला, सामाजिक जाणिवेतून मदतकार्य देखील मोठ्या प्रमाणावर केले. अनेक ठिकाणी मंदिर आदी जिर्णोद्धारसाठी निधी देखील उपलब्ध करून दिला. युवकांची फौज त्यांनी पाठीशी उभी केली. आपल्याच मित्रांचे कार्यकर्ते फोडून त्यांनी आपले पाठीराखे निर्माण केले. मतदारसंघात मोठमोठे मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले, नौटीयाल सारख्या दिग्गज गायकाला सावंतवाडीत आणले. दोडामार्ग येथे भटक्या गाईंसाठी गोशाळा सुरू केली, रुग्ण सेवेसाठी रुग्णवाहिका वाटप केले, आणि त्याचा गाजावाजा करताना दहा हजारांचा लवाजमा सावंतवाडीत आणत “न भूतो न भविष्यती” असा अभूतपूर्व, लोकांच्या नजरेत भरणारा लोकार्पण सोहळा केला. बचतगटाच्या बायका, अनेक लोक कार्यक्रमात आले परंतु विशाल परब एवढा खर्च करतो त्याच्या पाठीशी कोण आहे..? एवढा अवाढव्य खर्च तो कुठून करतो..? असे अनेक प्रश्न मतदारसंघातील जनतेच्या मनात उत्पन्न होऊ लागले आहेत. त्यातच विशाल परब यांना मुंबईतून धमकी आल्याची चर्चा सुरु असताना, त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले. विशाल परब अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे, मात्र आपण निवडणुक लढविणार की नाही, हे विशाल परब यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. आयत्यावेळी नेत्यांच्या छुप्या पाठिंब्यावर शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिपक केसरकर यांच्या विरोधात मित्र पक्षाच्या नेत्याची रणनिती असू शकेल, अशीही चर्चा आहे.
नाम.दिपक केसरकर यांनी मतदारसंघात विकासात्मक काम केलेच नाही अशी टीका वारंवार विरोधक करत असतात. त्यामध्ये मित्रपक्ष म्हटल्या जाणाऱ्या भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राजन तेली हेच आघाडीवर असतात. परंतु राजन तेली हे देखील सत्तेचा एक भाग होते, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष होते, मग सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवायचीच होती तर सावंतवाडी मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यास त्यांना कोणी अडविले होते..? आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी का विकासकामे केली नाहीत..? असेही प्रश्न आम्ही सावंतवाडीकर म्हणणारे राजन तेली यांना विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकंदरीत सारासार विचार केल्यास सध्याच्या घडीला सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघात शांततामय वातावरण राखणारे लोकप्रिय नेते, मंत्री दिपक केसरकर यांना आव्हान निर्माण करेल असा एकही नेता दिसत नसून मतदारसंघात केसरकर यांचेच पारडे जड असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा