मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
लवकरच होणार्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसारित करण्यात येणार आहे. त्यात इंटकच्या कामगार विषयक मागण्यांचा समावेश व्हावा, यासाठी काल (१५ ऑक्टोबर) जाहिरनामा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्र इंटकच्या शिष्टमंडळाने मुंबईत भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळात महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, कोषाध्यक्ष दिवाकर दळवी, मुंबई इंटक अध्यक्ष अमित भटनागर आदी उपस्थित होते.
रविवारीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अन्य मान्यवर खासदार उपस्थित होते. इंटक, आयटक, सिटू, एचएमएस, कामगार सेना आदी संयुक्त कृती समितीत समाविष्ट असणाऱ्या सर्वच कामगार संघटनाचे नेते रविवारच्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी सर्वांना आपआपल्या युनियनच्या कामगार विषयक प्रश्नांचे निवेदन महाविकास आघाडीच्या जाहिरनामा समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे काल महाराष्ट्र राज्य इंटकच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कामगार संघटना कृती समितीने या पूर्वीच पाठिंबा दिला असून, कामगारहित विरोधी पावले उचणार्या महायुती सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी कामगार संघटना प्रचारात सहभागी होणार आहेत. सत्तेवर येताच महाविकास आघाडी कामगारांच्या प्रश्न सोडवणूकीला प्राधान्य देईल, अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारच्या बैठकीत दिली आहे.