स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिन उत्साहात साजरा :
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रित्यर्थ ‘ वाचन प्रेरणा दिन ‘ व ‘ जागतिक विद्यार्थी दिन ‘ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी कु. सायना अळवणी हिने केले. तर, इयत्ता ६ वी मधील कु. हेरंब नाटेकर याने त्याच्या वाचनातून डॉ. अब्दुल कलाम यांचा जीवनपट सर्वांसमोर उभा केला. त्यांचे अनेक पैलू, त्यांची कामाची जिद्द तसेच, डी.आर्.डी.ओ., आय्.एस्.आर्.ओ., पी.व्ही.एल् III अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी दिलेला मोलाचा वाटा याबद्दल माहिती दिली. तसेच,’ वाचाल तर वाचाल’ या संकल्पनेचा तंतोतंत अर्थ पटवून दिला.
डॉ. अब्दुल कलाम यांना मानवंदना देताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व आजच्या आधुनिक पिढीला साहित्याची गोडी लागावी म्हणून वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. वाचनाची ओढ लगावी यासाठी कसे प्रयत्नशील रहावे व त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडतेच पण शब्दसंपत्तीमध्येही वाढ होते, विविध संदर्भ वाचन आपल्याला जगण्याचे मोल शिकवतात असे विद्यार्थ्यांंना पटवून दिले. शालेय ग्रंथपाल शिक्षिका सौ. मीनाक्षी राजावत यांनी शाळेतील इयत्ता १ ली ते ६ वीच्या विद्यार्थ्यांंना शालेय ग्रंथालयातील विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी दिली. अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे इंग्रजी, हिंदी व मराठी या तिन्ही भाषांमधून पाठ्यपुस्तकांव्यतिरीक्त अन्य पुस्तके देऊन वाचनकार्य करून घेतले.
अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.