You are currently viewing वळण / कथासंग्रह 

वळण / कथासंग्रह 

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांच्या “वळण” कथासंग्रहाचे प्रा.कुंडलिक शांताराम कदम यांनी केलेला पुस्तक परिचय*

 

 

पुस्तकाचे नाव.. वळण / कथासंग्रह 

लेखक.. संजय धनगव्हाळ

प्रकाशन.. चेतक बुक्स पुणे

पाने.. 80

किंमत.. 130 रुपये

आवृत्ती.. सप्टेंबर 2017

पुस्तक क्रमांक.. 198

परिचयकर्ता.. प्रा. कुंडलिक शांताराम कदम

 

वळण या कथासंग्रहात सामान्य माणसांच्या कथा वाचायला मिळतात. सामान्य माणसांच्या व्यथा यात मांडल्या आहेत. अनेक कथा वाचताना त्या आपल्या अवतीभोवती घडल्या आहेत असं वाटत. सामान्य माणसांची केवळ दुःख, व्यथा त्यांनी मांडली नाही तर त्यावर त्यांनी कशी मात केली आहे हे यात मांडले आहे.

भीक ही कथा नावावरून आपल्याला वेगळी वाटते. पण एक बाप आपल्या होणाऱ्या सुनेकडे एक आगळी वेगळी भीक मागत आहे. गुणवंत आणि मधू यांचे होणारे लग्न, अचानक गुणवंत याचे जाणे, मृत्युच्या वेळी गुणवंत याची मागणी, मधुचा ठामपणा, गुणवंत यांच्या वडिलांची भूमिका, हे सगळं वेगळेपण आपल्याला यात वाचायला मिळते.

सौभाग्यगाठ यात बॉस असणारा प्रशांत आणि त्याची ऑफिस मधील कर्मचारी असणारी मेघा यांच्यात होणारा जेवणाच्या वेळेत होणारा सवांद या कथेत मांडला आहे. कालावधी अगदी छोटा असला तरी दोघांची दुःख आणि त्यातून झालेली सौभाग्यगाठ वाचायला भारी वाटते. त्या दोघांमध्ये होणारे सवांद जीवनाच्या अनेक पैलू वर भाष्य करतात. विशेषता सुख आणि दुःख यावर प्रकाश टाकतात.

त्यातील एक सवांद,

“चारचौघांशी बोलल्यावर माणूस दुःख विसरतो. मन हलकं होतं. जगात वेगवेगळ्या विचारांची माणसं असतात. प्रत्येकाची जगण्याची पद्धत निराळी असते. काही माणसं जोडतात तर काही माणसांपासून दूर राहतात. स्वभावाला औषध नाही. माणसं जोडता आली नाही तरी हरकत नाही. पण आयुष्य जगता यायला हवं.”

“अगदी बरोबर. आयुष्य जगता यायला हवं, जगण्याचा पुरेपूर आनंद घेता यायला हवा. आज जेवढं जगता आलं तेवढं जगावं. उद्या कोणी पाहिला. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे मेघा ! पण उगाचंच कुणाचा एकांत भंग करायला मला आवडत नाही. जेवतांनाच सर्व एकत्र येऊन कामाच्या व्याधीपासून क्षणभर मुक्त होतात. तेंव्हा उगाच दडपण नको म्हणून….”

भूत ही एक रहस्यकथा आहे. चंद्रा, मावशी, बंगल्यातील व्यक्ती आणि वाट चुकलेला वाटसरू यांच्यातील ही कथा आहे. जेवण हे यात अधिक रहस्य निर्माण करते.

पाळणा ही कथा एका स्त्रीची वेदना मांडते. मूल होत नाही म्हणून समाजात, नातेवाईकात होणारी घुसमट, होणारा अपमान यातून त्या स्त्रीला कस जावे लागते ते यातून मांडले आहे..

जिद्द ही एक प्रेरणादायी कथा आहे. जिद्दीच्या जोरावर हॉटेल सुरु करून तरुणांना एक वेगळा संदेश दिला आहे.कथेचा शेवट खास केला आहे.

नोकरी मिळवण्यासाठी आजही भटकणाऱ्यांची संख्या कमी नाही. म्हणून जेथेही माझं हॉटेल असेल तेथे मी कायमचा बोर्ड लावून ठेवलाय. पाहिजे, पदवीधर बेरोजगार. आणि पुढे लिहिलय इथे जिद्द विकली जाते घेणाऱ्याचे हात दुबळे नसावे हि प्रमुख अट आहे.

कथासंग्रहाचे नाव असणारी वळण ही कथा.. मुलीचे लग्न वेळेत झाले पाहिजे हा एक संदेश यातून दिला आहे. यात माधवीताई यांनी केलेले चिंतन छान आहे.

“आयुष्य असंच असतं. आयुष्य म्हणजे काटेरी कुंपण असतं गं! बायकांना खूप जपून रहावं लागतं. कुंपणाच्या प्रत्येक काट्याच्या वेदना सहन कराव्या लागतात. लग्न म्हणजे आयुष्याच्या, म्हणावं तर नशिबाच्या पदराला मारलेली गाठच असते. मुलीला आईचं घर दोन दिवसांसाठी असतं. सासर जन्मभरासाठी असतं. माहेरच्या अंगणातला मुलीचा पाय सासरच्या उंबरठ्यावर जाईपर्यंत, जगण्याला अर्थच येत नाही. आधाराशिवाय मुलीच्या आयुष्याला सुगंध येत नसतो आपला हक्काचा आधार असला की मग जीवनाच्या असंख्य वाटा मोकळ्या होतात. दोघांची स्वप्न सहज साकार होतात. आईच्या मायेने मुलगी वाढते आणि नवऱ्यासोबत ती तिचं आयुष्य घालवत असते. नशिबानं जे दिलंय ते तुला लाख मोलाचं आहे. आता यानंतर कसं जगायचं ते तु ठरव.

मांडव या कथेतील सुनील त्याची पत्नी शेवंता यांची ही कथा आहे. शेवंताला फिट येण्याचा आजार असतो. त्यातून सुनीलच्या संसाराची झालेली दशा यात मांडली आहे. कथा वाचून अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.

मुक्ता ही मुक्ताच्या जिद्दीची आणि तिला साथ देणाऱ्या बाईसा ( पोलीस इन्स्पेक्टर ) या दोघींच्या जीवनाची आणि जिद्दीची कहाणी आहे. वाईट परिस्थिती निर्माण झाल्यावर खचून न जाता जिद्दीने त्यावर मात करता येते हा संदेश यात दिला आहे.

पाठलाग ही एक भावनिक कथा. यातील “ माझ्या अपूर्ण कथेची कादंबरी तुम्हाला अर्पण करतोय “ हे वाक्य मनाला चटका लावून जाते.

घरपण या कथेत घराला घरपण येण्यासाठी आजी आजोबा हवेत असा मोलाचा संदेश यातून दिला आहे.

प्रा. कुंडलिक शांताराम कदम

कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण

कार्यकारणी सदस्य अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्था शिरूर, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा