राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब*
सावंतवाडी :
शिरोडा वेळागरा येथे ताज प्रकल्प भूमिपूजनवेळी ग्रामस्थांचा उद्रेक दिसून आला. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थ आणि महिलांना मिळालेली वागणूक ही निषेधार्ह आहे. वेळागर येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब हे वेळागर येथील शेतकरी बांधवांसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पार्टी ग्रामस्थांसोबत आहे असे प्रतिपादन कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी केले.
मा. सभापती चमणकर व वेळागरवासियांना बरोबर घेवून या प्रश्नी आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब यांची भेट घेतली होती. त्यावेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांचे प्रश्न समजून घेतले होते. त्यानंतर राज्याचे मा. मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधत शेतकरी, ताज कंपनीसोबत बैठकीसाठी वेळ मागितली होती. मात्र, ही बैठक शासनाकडून घेतली गेली नाही. का घेतली नाही ? त्याचे कारणही समजू शकले नाही. यातच रविवारी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रकल्पाचे भूमीपूजन केल्याने लोकांच्या रोषाला मंत्रीमहोदयांना सामोर जावे लागले. स्थानिक भूमिपुत्रांवर होत असलेला अन्याय सहन केला जाणार नाही. ग्रामस्थ आणि महिलांना दिली गेलेली वागणूक निषेधार्ह होती. आम्ही वेळागर वासियांसोबत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ग्रामस्थांसोबत ठामपणे उभा राहील असे प्रतिपादन सौ. अर्चना घारे-परब यांनी केले.