You are currently viewing अमरावती येथे 15 ऑक्टोबर पासून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव

अमरावती येथे 15 ऑक्टोबर पासून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव

दि. 15 ऑक्टोबर पासून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे संपन्न होत आहे त्यानिमित्त…

 

*पुष्पाताई बोंडे. : राष्ट्रसंतांचे अनुकरण*

 

श्रीमती पुष्पाताई बोंडे आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ संचालक मंडळाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या त्या भगिनी लागतात. खरं म्हणजे त्यांना राजकारणात फार मोठे करिअर करता आलं असतं. राजकारण बाजूला ठेवून त्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होऊन राष्ट्रसंतांचा प्रचार प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात करीत आहेत. त्यांना तसा राजकारणाचा भरपूर वारसा आहे. माहेरचा आहेच पण सासरचा आहे. त्यांचे सासरे एडवोकेट नानासाहेब बोंडे हे खासदार होते. आम्हाला आठवते भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पडत्या काळात ज्या ज्या लोकांनी त्यांना समर्थ साथ दिली त्यामध्ये पुष्पाताई बोंडेचा सहभाग आहे. सत्तेवर नसताना श्रीमती इंदिरा गांधी यांना अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरविण्याचे काम श्रीमती पुष्पाताई बोंडे यांनी केले. डॉ.विजय बोंडे हे श्रीमती इंदिरा गांधी यांचे त्यांच्या पडत्या काळात सारथी झाले. डॉ. विजय बोंडे यांच्या फियाट कार मधूनच इंदिरा गांधींनी या भागातील दौरा केला.

आज श्री संत गाडगेबाबा व श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा नावलौकिक संपूर्ण भारतामध्ये आहे. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे व अमरावती विद्यापीठाला श्री संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात यावे यासाठी खरा पुढाकार घेतला तो पुष्पाताईंनीच. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण यांना गळ घातली. ही मागणी अनेक दिवसाची होती .पण पुढे पुढे ढकलली जात होती. पुष्पाताईंनी अशोकरावांना वस्तुस्थिती सांगितली. या थोर महात्म्यांचे महत्त्व सांगितले आणि भाऊबीजेची ओवाळणी म्हणून या विद्यापीठांच्या नामांतराची मागणी केली. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण नमले आणि त्यांनी या विद्यापीठाचे नामांतर केले. एवढे मोठे काम करूनही त्यांनी कुठेही आपल्या नावाची प्रसिद्धी केली नाही. फ्लेक्स लावले नाहीत आणि श्रेयपण घेतले नाही. त्या एवढेच म्हणतात हे काम राष्ट्रसंतांचे आहे. हे काम श्री संत गाडगेबाबांचे आहे .मी तर फक्त वारकरी आहे .त्यांच्यासाठी जे जे करता येईल तेथे मी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

पुष्पाताईंना मध्यंतरी महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद चालून आले. अगदी सुरुवातीला अमरावती महानगरपालिकेमध्ये काही काळ त्या नगरसेवक ही म्हणून कार्यरत होत्या. महिला काँग्रेसचे अध्यक्ष पद म्हणजे फार मोठी जमेची बाजू. पण पुष्पाताईचा खरा पिंड अध्यात्माचा. त्यामुळे त्यांनी महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचा व्याप संपूर्ण भारतात पसरलेला आहे. या मंडळाच्या सर्वत्र भारतात हजारो शाखा आहेत. आणि म्हणूनच पुष्पा ताईंनी माणूस द्या मज माणूस द्या हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा संदेश गावोगावी खेडोपाडी पोहोचण्यासाठी स्वतःला खऱ्या अर्थाने वाहून घेतले आहे.

मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण सत्तेत असताना पुष्पाताईंच्या घरी सदिच्छा भेट देणार होते. मला पुष्पाताईंचा फोन आला .त्या म्हणाल्या दादा तुमचे आय ए एस चे सगळे पोरं घेऊन या. अशोकदादाचा परिचय करून देते. तो भावी आयुष्यात त्यांना उपयोगी पडेल. मला नवलच वाटलं. राजकारणी लोक राजकारणातील लोकांना बोलावितात. पण पुष्पाताईंना माझे काम माहीत होते .त्यामुळे त्यांनी त्या निवडक लोकांच्या यादीमध्ये माझा समावेश केला. मुख्यमंत्र्यांना माझा परिचय करून दिला. आम्ही संधीचा फायदा घेतला व आमच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करून घेतले. मुख्यमंत्र्यांची डायरेक्ट भेट झाल्यामुळे आमचे सर्व विद्यार्थी प्रसन्न झाले. ते श्रेय द्यावे लागेल ते पुष्पाताईंनाच.

आमचे सर्व कार्यक्रम बहुतेक गुरुकुंज मोझरी व अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोडवरील ग्रीन सर्कल मध्ये होतात. अंकुर साहित्य संमेलन असो की विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन असो की स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर असो आम्ही निवड करतो ते गुरुकुंज मोझरी या स्थळाचे. कारण तिथल्या वातावरणात राहून मुलांवर बरेचसे संस्कार होतात. सात दिवस मुले थांबून गुरुकुल मोझरीच्या वातावरणाने भारावून जातात. शिवाय या कामी संचालक मंडळाचे अध्यक्ष श्रीमती पुष्पाताई बोंडे सरचिटणीस श्री जनार्दन पंत बोथे हे आमच्या सदैव मदतीला असतात. म्हणून आमच्या कार्यक्रमाला जो जो गुरुकुंज मोझरीला येतो. तो आम्हाला चांगल्या स्थळाची निवड केल्याबद्दल धन्यवाद देतो.

परवा आम्ही एक साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरी येथे घेतले होते. कोल्हापूरच्या दैनिक पुढारीचे संपादक श्री श्रीराम पचिंद्रे हे उद्घाटनाला येणार होते. पण ते वेळेवर येऊ शकले नाहीत. मी पुष्पाताईंना विनंती केली त्यांच्या हस्ते उद्घाटन केले. त्यांनी केलेले उद्घाटन पर भाषण सर्वांना आवडले .एखाद्या मराठीच्या प्राध्यापकांनी द्यावे त्या प्रकारे त्यांनी आपल्या शब्दाची समर्थपणे मांडणी करून साहित्यिकांसमोर मांडले. मी देखील त्यांचे असे भाषण पहिल्यांदाच ऐकले होते. मी पुष्पाताईंना म्हटले तुम्ही खूपच सुंदर भाषण दिले .त्या म्हणाल्या जे माझ्या मनात होते जे जीवन मी जगते ते मी माझ्या शब्दांमध्ये व्यक्त केले .नवीन असे काही सांगितले नाही .

मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर पासून संपूर्ण भारतातील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वर तसेच ग्रामगीतेवर प्रेम करणारे भक्त मित्र अधिकारी समाजकारणी राजकारणी नागरिक गावकरी गुरुकुंज मोझरीला येणार आहेत आणि त्यांच्या स्वागताला पुष्पाताई आणि त्यांचे संचालक मंडळ 24 तास हजर राहणार आहे. या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त त्यांना व त्यांच्या संचालक मंडळाला हार्दिक शुभेच्छा..!

======================

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आय ए एस

डॉ.पंजाबराव देशमुख आयएस अकादमी

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा