मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
कामगार महर्षी गं. द. आंबेकर यांचा वारसा पूढे नेतांना, गिरणी उद्योगाव्यतिरिक्त महाराष्ट्रातील अनेक उद्योगातील कामगारांना संघटित करण्याचा विडा आम्ही उचलला असून, त्या अंतर्गत ऍप आधारित ओला-उबेरच्या वाहतूक व्यवसायात गिरणी उद्योग तसेच अन्य उद्योगातील कामगारांच्या बेरोजगार मुलांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी नवीन हेल्पलाईन ऍपचे उद्घाटन करताना केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे दसरा संमेलन आणि वर्धापनदिन सोहळा आज परळ येथील मनोहर फाळके सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून आमदार सचिनभाऊ अहिर बोलत होते. प्रारंभी संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी विविध कामगार समस्येवर बोलतांना आपल्या स्वागतपर भाषणात, आंबेकरजींचा विधायक वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वाहतूक विभागाचे प्रमुख उपाध्यक्ष सुनिल बोरकर आणि संघटक शेख रिझवान यांच्या सहयोगाने, ओला-उबेरची ग्राहक सेवा केवळ मर्यादित तासांमध्ये कार्यरत असली तरी, संकटात सापडलेल्या वाहकांना मदत मिळावी, म्हणून ही महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ संचलित हेल्पलाइन सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. तिचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ अहिरे यांनी केले.
मुंबईसह एम. एम. आर. डी. ए. अंतर्गत एॅप आधारित ओला-उबेर वाहतूक सेवेचा आज ग्राहकांना निकडीच्या कामासाठी टॅक्सी-रिक्षा पाठोपाठ उपयोग होऊ लागला आहे. या आयोजकांच्या मुद्याकडे वळून आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, या नवीन हेल्पलाइन द्वारे संकटात सापडलेल्या चालकांबरोबर ग्राहकांचे संरक्षण झाले पाहिजे. या व्यवसायात ओला-उबेर मधील चालक-मालकांचे हित जोपासताना टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांची रोजी रोटी कायम राहिली पाहिजे,असेही सचिन अहिर यांनी सांगितले. आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी. बी. गावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कोलोंबिया यूनिव्हर्सिटिच्या ओला- उबेर वाहतुकीतीच्या अभ्यासक मारीन थोरने खास पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. खजिनदार निवृत्ती देसाई उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, शिवाजी काळे, मिलिंद तांबेडे, किशोर रहाटे, साई निकम, काशिनाथ माटल आदी पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते. दसर्याच्या पूर्वसंध्येला आपट्याची पाने एकमेकांना देऊन एकमेकांचा आदर भाव जपण्यात आला.