You are currently viewing दसरा

दसरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दसरा*

 

नऊ दिवस, नऊ रात्र

नवरंगाची उधळण

आनंदाला नसे तोटा

आला दसऱ्याचा सण

 

साडेतीन मुहूर्तांपैकी एक

शुभकार्यास महत्त्वाचा

पाटीवर करूनी श्रीगणेशा

सरस्वती पूजनाचा

 

अज्ञातवासाची सांगता

पांडवांची याच दिनी

आपट्याजवळील शस्त्रं

घेती पूजन करूनी

 

दशैन असेही नाम असे

नेपाळचा राष्ट्रीय सण

रामलीलेची समाप्ती

नवरात्राचा अंतिम दिन

 

सीताप्राप्तीस्तव रावणाचा

वध केला श्रीरामाने

ते सुयश साजरे करीती

विजयादशमी निमित्ताने

 

दसऱ्यादिवशी सायंकाळी

उत्साहाने रावणदहन

मनामनातील रावणाचे

कधी समूळ उच्चाटन?

 

ऐतिहासिक महत्त्वाचे

युद्धास्तव सीमोल्लंघन

स्त्रीपुरुषांच्या मर्यादांचे

मात्र होतसे सीमोल्लंघन

 

आवर्जून नवरात्रामध्ये

मनोभावे कन्यापूजन

वर्षभर का निष्ठुरपणे

अजाण बालिकांचे शोषण?

 

दुष्टांवरती सुष्टांचा

अंधारावर प्रकाशाचा

विकृतीवर सत्प्रवृत्तीचा

अधर्मावर धर्माचा

 

उद्देशाविन उपचार नको

सृजनाशी संबंधित असे

विविध कथांचे संदर्भ

विजय हा न्यायाचा असे

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

१२-१०-२४

bharati.raibagkar@gmail.com

 

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत आपल्याला कविता आवडल्यास नावासह नक्की लाईक आणि शेअर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा