You are currently viewing मालवणात दिव्यांग बांधवांच्या शिबिरास प्रतिसाद…

मालवणात दिव्यांग बांधवांच्या शिबिरास प्रतिसाद…

मालवणात दिव्यांग बांधवांच्या शिबिरास प्रतिसाद…

मालवण

तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तालुका स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ५४ दिव्यांग लाभार्थ्यांना ८८ प्रकारच्या आवश्यक साहित्याची मागणी नोंदवण्यात आली आहे.
तालुक्यातील दिव्यांगासाठी कृत्रिम व सहाय्यभूत साधन वाटप करण्यासाठी आवश्यक कृत्रिम साधनांचे मोजमाप व साहित्य घेणे, आरोग्य विषयक तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्रे करिता नोंदणी करणे, दिव्यांग वैश्विक ओळखपत्र नोंदणी व नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करणे यासाठी भारत कृत्रिम अंग निर्माण केंद्र, भारत सरकार, जिल्हा समाजकल्याण कार्यालय जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत येथील पंचायत समिती, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या समन्वयाने तसेच मातृत्व आधार फाउंडेशन यांच्या सहयोगाने तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांचे शिबीर तालुकास्कुल येथे झाले. याचे उदघाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अनिल शिंगाडे, जिल्हा समाजकल्याण कार्यक्रम समन्वयक यतीन अहिर, ग्रामीण रुग्णालय मालवणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर धनगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
या दिव्यांग शिबिरात तालुक्यातील कर्णबधीर, अस्थिव्यंग, अंध-मूकबधीर असे ८१ दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते. या शिबीरामध्ये ५४ दिव्यांग लाभार्थ्यांना ८८ प्रकारच्या आवश्यक साहित्याची मागणी नोंदवण्यात आली आहे. बॅटरीवर चालणारी ट्रायसिकल, फोल्डेबल वॉकर, वॉकिंग स्टिक, व्हील चेअर, हात काठी अशा साहित्याची मागणी करण्यात आली. या साहित्याची किमंत ५ लाख १७ हजार ३७८ रुपये एवढी आहे. या शिबीरासाठी दिव्यांग लाभार्थी व त्यांच्या समवेत आलेल्या मदतनीस यांना नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था तालुका प्रशासनामार्फत करण्यात आली होती.
या शिबीरासाठी कृत्रिम अवयव तज्ज्ञ डॉ. रितू, डॉ. प्रियांका चंद्रा, वाचा व कर्ण उपचार तज्ज्ञ डॉ. हिमांशू, कृत्रिम अवयव जोडणी तज्ज्ञ कलीम शेख, राम जाधव, श्रीमती दळवी, संगणक नोंदणी सहाय्यक अमन वर्मा यांच्या सहकार्याने दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
या शिबीरासाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, अन्य विभागाचे अधिकारी, वरिष्ठ, कनिष्ठ सहाय्यक, परिचर यांचे सहकार्य लाभले. या शिबीरामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना शिबीराचा लाभ घेण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांनी सहकार्य केले. तसेच मातृत्व आधार फाउंडेशनच्या स्वयंसेवक, पदाधिकाऱ्यांनी मदत करून प्रशासनाला सहाय्य केले. जिल्हास्तरावरून या दिव्यांग शिबीराच्या पाहणीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी विनायक ठाकूर हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा