You are currently viewing अन्यथा भटक्या कुत्र्यांना मालवण नगरपालिकेत सोडून तीव्र आंदोलन छेडू…

अन्यथा भटक्या कुत्र्यांना मालवण नगरपालिकेत सोडून तीव्र आंदोलन छेडू…

अन्यथा भटक्या कुत्र्यांना मालवण नगरपालिकेत सोडून तीव्र आंदोलन छेडू…

मनसेचा आक्रमक इशारा:नगरपालिकेला निवेदन सादर..

मालवण

मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढून कुत्र्यांकडून लहान मुले व नागरिकांवर हल्ले होत असून मालवण नगरपालिका प्रशासनकडून कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कुत्र्यांकडून होणाऱ्या या हल्ल्याना नगरपालिकाच जबाबदार आहे, असा आरोप करत आज मनसेने करत कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास भटक्या कुत्र्यांना नगरपालिकेत आणून सोडू तसेच तीव्र आंदोलन छेडू असा आक्रमक इशारा मनसेतर्फे मालवण नगरपालिकेला निवेदनाद्वारे देण्यात आला.

मालवण शहरातील कुत्र्यांच्या उवद्रवाबाबत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण नगरपालिकेत प्रशासनाची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी अधिकारी श्री. सुधाकर पाटकर यांच्याशी चर्चा करून भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत लक्ष वेधले. यावेळी मनसेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, अमित इब्रामपूरकर, विशाल ओटवणेकर, गुरु तोडणकर, सागर जाधव आदी उपस्थित होते.

मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून चार दिवसांपूर्वी शहरातील एका लहान निष्पाप बालकावर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या सर्व प्रकारास संपूर्णपणे नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. नौदल दिनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला होता. आज नागरिकांवर कुत्र्यांकडून जीवघेणे हल्ले होत असताना घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासनाने तत्काळ उपाय करणे बंधनकारक होते. परंतू अशा कोणत्याही प्रकारची उपाययोजना नगरपालिकेकडून झालेली नाही, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर अधिकारी श्री. पाटकर यांनी कुत्रे पकडून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिकेकडून तीन वेळा निविदा काढण्यात आली, मात्र त्यास प्रतिसाद मिळालेला नाही, मात्र कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.

मात्र, नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी येत्या १५ दिवसात उपाययोजना न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगरपालिकेत कुत्रे सोडले जातील व नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा