सावंतवाडी :
छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास लोकांपर्यंत पोहोचविणार्या इतिहास अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा शिवसंस्कार परिवाराच्या माध्यमातून सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा १३ ऑक्टोबरला सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश ठाकुर व अध्यक्षा डॉ. सोनल लेले यांनी दिली.
मातृभूमी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडी शिवसंस्कार संस्थेच्या माध्यमातून दुसरा वर्धापन सोहळा सावंतवाडीत आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी संस्थेच्या पदाधिकार्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मंदार गावडे, नितीन नाईक, प्रज्ञा मातोंडकर, श्रीता राऊळ, कृष्णा करमळकर आदी उपस्थित होते. यावेळी सौ.लेले पुढे म्हणाल्या, हा कार्यक्रम १३ ऑक्टोंबरला सायंकाळी ४ वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे होणार आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष मोरे, यशवंतराव भोसले पॉलीटेक्निक चेअरमन अच्युत भोसले, सावंतवाडी संस्थान युवराज लखमराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज फेम सिने अभिनेते गश्मीर महाजनी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे, युवा इतिहास अभ्यासक सौरभ करडे, इतिहास संशोधक सचिन मदगे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तर प्रतापराव देसाई, श्रुती जोशी, उमाजी राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.