तळवडे येथील चोरी प्रकरणी दोघेजण ताब्यात
दोघांना १० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
सावंतवाडी
तळवडे खेरवाडी येथील बंद घर फोडून चोरट्याने रोख रक्कम दागिने असा सुमारे ३१ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. याबाबत अक्षता यशवंत सावंत (रा. तळवडे खेरवाडी ) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी तपास करीत दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. तेजस दीपक गावडे ( २५ ) व सचिन विनायक गावडे (३३, दोघेही रा. तळवडे खेरवाडी ) अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही १० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तळवडे खेरवाडी येथील अक्षता सावंत ही महिला नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यास गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचा मागील लोखंडी दरवाजा पेचून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली रोख ४१०० रुपये रोकड तसेच २५ हजार रुपये किमतीची जास्वंदीच्या पानांची डिझाईन असलेली सोन्याची दोन कुडी व २५०० रुपये किमतीची मोत्यांचे मणी असलेली सोन्याची नथ मिळून सुमारे ३१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. रात्री घरी परतल्यानंतर सदर चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यावर अक्षता सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती त्यानंतर अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे मनोज राऊत व निलेश नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. त्यानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद देठे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा दोन संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता १० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.