डॉन्टस यांच्या शिस्त व मार्गदर्शनामुळेच सैनिक पतसंस्था व कॅथलिक पतसंस्थेची सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी
जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी
पी.एफ. डॉन्टस पुण्यस्मरण सप्ताह समारंभ
सावंतवाडी
स्वर्गीय पी. एफ. डॉन्टस यांच्या शिस्त व मार्गदर्शनामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक नंतर आज सैनिक पतसंस्था व कॅथलिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. तर मी आज ज्या पदावर आहे त्यामागे पी एफ. डॉन्टस यांचे मोठे योगदान आहे. असे स्पष्ट मत सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केले.
स्वर्गीय पी.एफ. डॉन्टस यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज सैनिक पतसंस्था शाखा कोलगाव येथील सभागृहात पी.एफ. डॉन्टस पुण्यस्मरण सप्ताह व पी. एफ. फाउंडेशनचे अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून मनीष दळवी बोलत होते. पी. एफ. डॉन्टस यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर मनीष दळवी यांच्या हस्ते पी. एफ. डॉन्टस फाउंडेशनचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी फादर मिलेट डिसोजा, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरसाट, कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन अनमारी डिसोजा, इंडियन एक्स सर्विसेस लिग सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, तातोबा गवस कर्नल( निवृत्त ) विजय सावंत, पद्मनाभ परब, शिवराम जोशी, कॅथॉलिक पतसंस्थेचे सेक्रेटरी मार्टिन अलमेडा, पी. एफ. डॉन्टस फाउंडेशनचे अध्यक्ष जॉय डॉन्टस, सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, कॅथॉलिक पतसंस्थेचे सरव्यवस्थापक जेम्स बॉर्जीस, सैनिक स्कूलचे कायार्लयीन सचिव श्री दीपक राऊळ व प्राचार्य श्री नितीन गावडे उपस्थित होते.
मनीष दळवी पुढे म्हणाले, डॉन्टस त्यांनी कार्य केले नाही असे समाजात एकही क्षेत्र सापडणार नाही. पर्यटन क्षेत्राचा विकास विकास व्हावा म्हणून त्यांनी प्रथम काम केले. तारकर्ली येथील तंबू निवास त्यांनी प्रथम उभारले. तारकर्लीचे नियोजित मॉडेल एमटीडीसी कडे डॉन्टस यांनी सादर केल्याचे दळवी म्हणाले. ते उत्तम राजकारणी, समाजासाठी लढणारे, चांगले मार्गदर्शक, चांगला मित्र होते. आपल्या जीवनाच्या कमी काळात त्यांनी सहकार क्षेत्रात जास्त काम केले. त्यांचे कार्य पुढे चालू राहण्यासाठी पी.एफ. डॉन्टस फाउंडेशनची स्थापना त्यांचा मुलगा जॉय यांनी केली असून त्याद्वारे यांचे विचार व कार्य अविरत पुढे घेऊन जाऊ या. या समाजाला दिशा देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे नेऊ या. फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यात मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन मनीष दळवी यांनी दिले.
फादर मिलेट डिसोजा यावेळी म्हणाले, पी. एफ. डॉन्टस यांनी आपल्या आयुष्यात चांगले काम केले म्हणून त्यांची प्रत्येक वेळी चांगली आठवण येते. ख्रिस्ती समाजासाठी काम करताना त्यांनी सर्व समाजासाठी काम केले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. सर्व मनुष्य जातीकरिता त्यांनी कार्य केले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचे कार्य अहोरात्र असेच चालू राहूदे, असे फादर म्हणाले.
यावेळी सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, कॅथॉलिक पतसंस्थेच्या चेअरमन अनमारी डिसोजा, कर्नल विजय सावंत, जॉय डॉन्टस, रवी मडगावकर, राजू तावडे, सैनिक स्कूलचा विद्यार्थी अथर्व पालव यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील राऊळ यांनी केले. यावेळी त्यांनी डॉन्टस यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैनिक स्कूलचे प्रा. ऋषिकेश गावडे यांनी केले.