You are currently viewing “टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी आहे!” – पद्मश्री पोपटराव पवार

“टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी आहे!” – पद्मश्री पोपटराव पवार

“टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी आहे!” – पद्मश्री पोपटराव पवार

पिंपरी

“स्थापनेपासून सातत्याने समाजासाठी आणि देशासाठी योगदान देणारा टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी आहे!” असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य आदर्शगाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे सोमवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी काढले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात पोपटराव पवार बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे अध्यक्षस्थानी होते. या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील उद्योजकांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये तळवडे येथील श्री ओम टेक्नो सर्व्हिसेसचे संचालक अनिल शेटे आणि कात्रज येथील गणेश ग्रुप इंजिनिअरिंग प्रॉपर्टीजचे संचालक मंगेश पोखरकर यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर आळंदी येथील हॉटेल नीलमचे संचालक नीलेश बोरचटे (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगभूषण पुरस्कार), कल्याणी अर्थमुव्हर्स ॲण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गोपीनाथ देशपांडे (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगविकास पुरस्कार), संगमनेर येथील रुद्रा मिल्क ॲण्ड मिल्क प्राॅडक्टचे संचालक डॉ. अक्षय पवार (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगश्री पुरस्कार), आदर्शगाव हिवरेबाजारच्या सरपंच विमल ठाणगे (भारतरत्न जे. आर. डी. टाटा ग्रामभूषण पुरस्कार) आणि चिखली येथील श्रेयश पॅकेजिंग मॅन्युफॅक्चरर्स ऑफ कोरोगेटेड बॉक्सेस रोल ॲण्ड सिटचे श्रेयश पुंड (भारतरत्न जे. आर. डी. टाटा युवा उद्योजक पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

पोपटराव पवार पुढे म्हणाले की, “शासन नियुक्त समितीच्या माध्यमातून रतन टाटा यांच्यासोबत काम करताना मला वेगळीच प्रेरणा मिळाली. माती आणि पाणी हे भविष्यात खूप महत्त्वाचे घटक ठरतील. त्यामुळे उद्योगव्यवसायांसोबत निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे!”
पंतप्रधान श्रमश्री पुरस्कारप्राप्त बाजीराव सातपुते यांनी ‘टाटांना अभिप्रेत असलेला एकविसाव्या शतकातील उद्योजक’ या विषयावरील व्याख्यानातून जे. आर. डी. टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू मांडले.
अध्यक्षीय मनोगतातून गिरीश प्रभुणे यांनी, “आपण शिवरायांचे वारसदार आहोत. स्वावलंबी होऊन आपल्या उद्योगांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणार्‍या उद्योजकांचे योगदान जगापुढे आले पाहिजे. तसेच त्यांच्या भावी पिढीने स्वतःचे व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे!” अशी अपेक्षा व्यक्त केली.

सरपंच विमल ठाणगे यांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले; तसेच पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. महेंद्र भारती, सुप्रिया सोळांकुरे, अरुण गराडे, जयवंत भोसले, फुलवती जगताप, राजू जाधव, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर वाघोले यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
७४९८१८९६८२
९४२१३०८२०१

प्रतिक्रिया व्यक्त करा