You are currently viewing पांढरा रंग

पांढरा रंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*५) पांढरा रंग*

 

स्वाती नक्षत्री पर्जन्यथेंब

शिंपल्यात पाणीदार मोती

कसबी हात पैलु पाडता

हिरे पांढरे लखलखती

 

बगळा करीतो बकध्यान

बिचारे जलचर फसती

नेते-पुढाऱ्यांचा गणवेश?

सफेद वस्त्रे शरीरावरती

 

पावसाळ्यात ढग पांढरे

चाहूल लागे दुष्काळाची

वैराग्य वृत्तीची निर्देशक

सफेद वस्त्रे साधुसंतांची

 

मिळो आशिर्वच सकला

शुभ्रवसना सरस्वतीचे

धवल शिखर मना मोहवी

बर्फाच्छादित हिमालयाचे

 

माध्यान्ही ऊन चकाकते

मार्तंड तळपे गगनात

शुभ्र कापसाची होते

निरांजनातील वात

 

ध्वजा पांढरी माथ्यावरती

जीव होई कासावीस

वार्धक्याची चाहूल नसे

कधी दिसते ऐन तारुण्यात

 

तिरंग्याच्या मध्यस्थानी

शुभ्र रंग विराजमान

बिनवासाची अन् सुवासिक

शुभ्र सुमने दिसती छान

 

दुधदुभत्याचा रंग पांढरा

पोषकद्रव्ये मुबलक असती

पांढरे शुभ्र ससे चपळ

गवतावरती बागडती

 

रंग पांढरा असे शांतीचा

कबुतरं संदेशवाहक

युद्धकाळात निशाण

तह करण्याचा सुचक

 

मौक्तिकासम दंतपंक्ती

सुहास्य खुलवी मुखावर

अरूण येई स्वार होऊनी

सात अबलख अश्वावर

 

सर्व रंग मिसळून जाती

मूळ पांढऱ्या रंगात

भाव-भावना एकवटती

नितळ, निर्मळ मनात

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

७-१०-२४

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा