You are currently viewing सा.बां. सावंतवाडीच्या अखत्यारीतील मालवण उपविभाग अवघे वीस महिने कार्य.अभियंता कार्यालय कणकवलीशी सलग्न

सा.बां. सावंतवाडीच्या अखत्यारीतील मालवण उपविभाग अवघे वीस महिने कार्य.अभियंता कार्यालय कणकवलीशी सलग्न

*सर्च रिपोर्ट*

*सा.बां. सावंतवाडीच्या अखत्यारीतील मालवण उपविभाग अवघे वीस महिने कार्य.अभियंता कार्यालय कणकवलीशी सलग्न…*

*सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम विभागात ‘सर्वा’त ‘गौड’बंगाल काय?*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग गेले काही महिने चर्चेचा विषय बनला आहे. मालवण सर्जेकोट येथील छ.शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना घडली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर सोशल मिडिया,प्रिंट मिडियामधून टीकेची झोड उठली, जिल्हाभरात नव्हे तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली परंतु शासनाने पुतळा बनविणारा शिल्पकार आणि आर्किटेक्ट यांच्यावर कारवाई केली..आणि जे कोणी राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचे काम सुरू असताना श्रेय घेत होते ते सर्व आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र नौदलावर जबाबदारी टाकून सहिसलामत सुटले. पण…, या सर्व घडामोडींमध्ये खरोखरच बांधकाम विभागाचे अधिकारी निर्दोष आहेत का…? हाच प्रश्न आजही अनेकांना पडतो आहे आणि त्याचे उत्तर नाही हेच असेल… कारण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २५ जानेवारी २०२३ पासून २६ सप्टेंबर २०२४ पर्यंत घडलेल्या घडामोडी पाहिल्या तर शंका येणे रास्तच आहे.
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण यांच्या अधिनस्त अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीच्या अधिपत्याखाली सावंतवाडी सह कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग व मालवण उपविभाग येत होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन निर्णय २५ जानेवारी २०२३ अन्वये मालवण उपविभागाचे कार्यालय सावंतवाडी विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीकडे अधिनस्त करण्यात आले होते. उक्त शासन निर्णय मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण यांचे क्र.मुअ(को)/परिमंडळ/३८८५ दि.२६ सप्टेंबर २०२४ या नुसार रद्द करण्यात आला. म्हणजे अवघे २० महिने कार्यकारी अभियंता, सावंतवाडी यांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम मालवण उपविभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आला. परंतु एवढ्या अल्प कालावधीसाठी मालवण उपविभाग कणकवली येथे का जोडण्यात आला? असे करताना त्याचे कारण काय दिले होते..? हे प्रश्न मात्र अनुत्तरित असून त्यांची उत्तरे जनतेला ज्ञात होणे आवश्यक आहे.
सावंतवाडी येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची राजकीय आकसापोटी किंवा अन्य कारणांनी सावंतवाडी येथून बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता सर्वागौड हे रुजू झाले होते. परंतु काहीच दिवसात अनामिका जाधव यांची झालेली बदली रद्द होऊन त्या पुन्हा सावंतवाडी येथे कार्यकारी अभियंता पदी रुजू झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावरील रागापोटी..? की कुणाच्या भल्यासाठी कार्य .अभियंता सावंतवाडी यांच्या अधिनस्त असलेला उपविभाग मालवण कार्यकारी अभियंता कणकवली कार्यालयाला जोडण्यात आला जिथे कार्यकारी अभियंता पदी सर्वागौड हे कार्यरत होते. मग आता इथे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतात ते म्हणजे कोणाच्या मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी मालवण उपविभाग कणकवली येथे जोडला..?
कार्यकारी अभियंता सर्वागौड यांच्यासाठीच मालवण उपविभाग कणकवली येथे जोडण्यात आला का..?
सार्वजनिक बांधकामचा मालवण उपविभाग कणकवली येथे जोडणे हे भौगोलिक क्षेत्र व विकास कामांमध्ये समतोल राखण्याच्या दृष्टीने अडचणीचे आहे असे २६ सप्टेंबरच्या निर्णयात शासन म्हणते तर जानेवारी २०२३ मध्ये असा चुकीचा शासन निर्णय घ्यायला कोणी भाग पाडले..? आणि कशासाठी..?
सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांच्याकडून काढून घेत कार्यकारी अभियंता कणकवली कडे अधिनस्त केलेला कालावधी पाहिला असता, मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छ.शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीच्या कालावधीशी जुळतो आहे. जून २०२३ मध्ये जयदीप आपटे या शिल्पकाराने पुतळा बनविण्यास सुरुवात केल्याचे आणि डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण केल्याचे दिसून येते. म्हणजे अवघ्या सहा महिन्यात २८ फुटी पुतळा तयार झाला होता..आणि दुर्दैव म्हणजे पुढच्या आठ महिन्यात म्हणजे २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळ्या मधील लोखंड गंजून पुतळा पडला. ४५ किमी वेगाने वारे हे जरी निमित्त असले तरी एकंदरीत पुतळा उभारणीची प्रक्रियाच सदोष असल्याने दोषी कोण..? हे कुणालाही विचारण्याची आवश्यकता भासत नाही.
नौदलाने पुतळा उभारला असे म्हटले तरी कणकवली बांधकाम विभागाने याकामी ५ कोटी निधी दिल्याची देखील माहिती मिळत आहे. मग जर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी यांच्या अधिनस्त मालवण उपविभाग असता तर तत्कालीन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी यांची काही अडचण झाली असती म्हणून कार्यकारी अभियंता सर्वागौड जिथे होते त्या कणकवली विभागाकडे मालवण उपविभाग वर्ग करण्यात आला का ?
आणि…..पुतळा दुर्घटना घडली, जिल्ह्यात, राज्यातच नव्हे तर देशभरात शी थू झाल्यानंतर “तो मी नव्हेच” या आविर्भावात भौगोलिक क्षेत्र आणि विकास कामात समतोल राखण्याचे कारण पुढे करून पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मालवण उपविभाग कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी यांच्याकडे अधिनस्त करण्यात आला का..?
मग….
सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण, कार्यकारी अभियंता कणकवली कडे अधिनस्त करण्यामागे ‘सर्वा’त ‘गौड’बंगाल नक्की काय…?

प्रतिक्रिया व्यक्त करा