*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माय मराठी*
जन्म कुसुमाग्रजांचा ,
सौभाग्य महाराष्ट्रा चे!
लाभे कृपा शारदेची ,
भाग्यवंत आम्ही येथे !
माय मराठी रुजली,
अमुच्या तनामनात!
दूध माय माऊलीचे,
प्राशिले कृतज्ञतेत !
साहित्य अंकी खेळले,
लेख, कथा अन् काव्य!
माऊलीने उजळले ,
ज्ञानदीप भव्य- दिव्य!
घेतली मशाल हाती ,
स्फुरे महाराष्ट्र गान !
भक्तीचे अन् शौर्याचे,
राखले जनी हे भान!
ज्ञानेश्वरी ज्ञानयाची,
सोपी भाषा तुकयाची!
मराठी रामदासांची ,
समृद्धी माय मराठीची!
सौंदर्यखनी मराठी,
कौतुक तिचे करू या!
मी महाराष्ट्रीय याचा,
अभिमान बाळगू या!
उज्वला सहस्रबुद्धे, पुणे