*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*
सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||”
*आजची तिसरी माळ/ दुसरे पुष्प…*
सुमित्रा मातेला समर्पित..🙏
“या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||”
सुमित्रा…
रामायणातील आयोध्यावासी श्री दशरथाच्या दरबारातील महत्त्वपूर्ण पण दुर्लक्षित झालेलं स्त्रीपात्र म्हणजे सुमित्रा. होय सुमित्रा! राजा दशरथाची द्वितीय पत्नी. अतिशय शांत, सालस ,प्रेमळ आणि मदतीस तत्पर अशी खानदानी स्त्री होती. काशीची राजकुमारी होती.
आयोध्येत झालेला पुत्र कामेष्टी यज्ञा वेळी अग्नी देवांनी जी खीर महाराणींना खाण्यासाठी दिली होती, त्यातील जास्त वाटा सुमित्रेकडे गेला होता आणि त्यामुळे सुमित्रास दोन मुलं झाली. एक लक्ष्मण आणि दुसरा शत्रुघ्न. म्हणजे लक्ष्मणाची आई माता सुमित्रा… याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
माता कौसल्या ही राजमाता म्हणून तिला खूप मान होता. तर माता कैकयी ही राजा दशरथाची आवडती राणी होती, म्हणून राजा दशरथ सतत कैकयीच्या महालामध्ये असत. मात्र माता कौसल्या पेक्षा लहान आणि माता कैकयी पेक्षा मोठी, अशीही माता सुमित्रा. सुमित्रा हिला फारसे कोणी विचारलेले दिसत नाही . तिच्या वाटेला उपेक्षेचे जीवन आलेले दिसते.ती एक राज दरबारातील दुर्लक्षित झालेली पण मान्यवर राजमाता होती. तरी देखील माता सुमित्राचे सर्व मुलांवर खूप प्रेम होते. हे चारही राजकुमार म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही सर्व जण रात्री झोपायला माता सुमित्राकडेच यायचे. माता सुमित्रावर मुलं खूप प्रेम करायचे आणि यातच सुमित्रा खूप समाधानी होती.
रामांच्या जीवनात जे स्थान लक्ष्मणाचे होते, तेच स्थान कौसल्येच्या जीवनात सुमित्राचे असलेले दिसते. कौसल्या मातेची सेवा माता सुमित्रा सतत करीत. त्यांना हवं नको ते बघे. जेव्हा कधी माता कौसल्या निराश होई, तेव्हा माता सुमित्रा त्यांना संभाळून घेई आणि त्यांचे सांत्वन करीत. वास्तविक दशरथाचे प्रेम माता सुमित्राच्या वाटेला कधी आलेच नाही. आणि तिने ही त्याची अपेक्षाच ठेवलेली नसल्याने तिला त्याचे फार दुःख ही नव्हते. ती सर्वच परिस्थिती समजून घेणारी एक बुद्धिमान स्त्री होती. माता कौसल्या प्रमाणे तिला आपला मुलगा लक्ष्मण किंवा शत्रुघ्न राजा होईल आणि आपले दिवस पालटतील, अशी आशाही नव्हती. तिने आपल्या आयुष्याचे स्वरूप ओळखून परिस्थितीशी जुळवून घेतले होते. ती कधीही उदास झालेली आपल्याला रामायणात दिसत नाही किंवा वैतागलेली ही दिसत नाही.
लक्ष्मण जसा श्रीरामांंबरोबर सतत सावली सारखा आहे, तसाच शत्रुघ्न हा भरताबरोबर असे, याचेही तिला दुःख नव्हते. उलट ती आशावादी होती. ती माता कौसल्येला सतत सांगे,की लवकरच राम, लक्ष्मण आणि सीता वनवास संपून परत येतील. त्यामुळे कौसल्या सतत आशावादी राहून, आपले जीवन कार्य चालू ठेवण्यात यशस्वी राहिली.
ज्यावेळी लक्ष्मणाने श्रीरामांबरोबर वनवासाला जायचा निर्णय माता सुमित्रेला सांगितला ,त्यावेळी माता सुमित्रा नाराज न होता, उलट आनंदी झाली. तिने त्याला रामाची आणि सीतेची नीट काळजी घ्यायला बजावले. त्या धीरोदात्तपणे आपला पुत्र लक्ष्मणास सांगते,
” तू अवश्य जा. अरण्यात जाताना तू एक गोष्ट लक्षात ठेव. अरण्यालाच तू अयोध्या मान. राम हे तुझे पिता आहेत आणि सीतेला माझ्या जागी माता मान.”
ज्यावेळेला लक्ष्मण युद्धाच्या वेळेला मूर्च्छित पडतो, त्यावेळेला माता सुमित्रा म्हणाली होती, की श्रीरामासाठी लक्ष्मणाने युद्ध करत आपलं जीवन त्यागले, त्यामुळे तो धन्य धन्य झाला.
“रामं दशरथं विद्धी मां विध्दी जनकात्मजम”
म्हणजे धन्य ती सुमित्रा माता! केवढा हा त्याग !
ज्यावेळी कौसल्या माता राम वनवासाला जाताना काळजी करत होत्या. दुःखी होत्या, त्यावेळेला माता सुमित्रा त्यांना म्हणते, ” धनुर्धर श्रेष्ठ लक्ष्मण ज्याच्या पुढे चालतो, त्या रामाला कोणाची भीती आहे ?”
हा तिचा आपल्या स्वतःच्या मुलाविषयी असलेला प्रचंड विश्वास दिसून येतो. माता सुमित्रा कायमच मनाने खंबीर आणि दृढ मनोवृत्ती बाळगताना दिसते. माता कौसल्या प्रमाणे सगळी दुःख ती सुद्धा भोगत होती. पण दुःखांना धीटपणे सामोरी जात होती. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणारी, संकटाला हसत हसत टक्कर देणारी, ही माता सुमित्रा लक्ष्मणाची आई! खरच धन्य होती. आपला मुलगा तिच्या पत्नीला सोडून वनवासाला जातो, तेव्हा आपल्या सुनेवर मुलीसारखं प्रेम करून तिला सांभाळणारी माता सुमित्रा ही श्रेष्ठ माऊली असल्याचे सिद्ध होते. आपल्या सुनेचे दुःख ती जवळून पहात होती. माता सुमित्राची सून म्हणजे उर्मिला ही आपल्या सासूची अत्यंत काळजी घेत होती. दोघींचेही दुःख नात्यांनी वेगळे असले, तरी दुःखाची सल मात्र एकच होती.
आज ही सीमेवर लढणाऱ्या मुलांच्या माता,पत्नी, भगिनी, मुली ही आपण समाजात पहातो.. त्यांच्यावर कोणती परिस्थिती कधी उद्भवेल हे कुणीच सांगू शकत नाही. किंवा कित्येक जणींचे पती असून नसल्यासारखे…किंवा बाहेरख्याली असतात अशा स्त्रियांचे दुःख किती मोठे असेल याची कल्पना ही कुणी करू शकणार नाही. कित्येकजणी आतल्याआत अश्रू ढाळत समाजात वावरत असतात.
अशा या सर्व माझ्या मते वीरांगना स्त्रियांना आणि या माता सुमित्रा ला माझा मानाचा मुजरा.
……………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
5/10/2024