You are currently viewing सामाजिक कार्यात रमणारा सनदी अधिकारी : रंगनाथ नाईकडे

सामाजिक कार्यात रमणारा सनदी अधिकारी : रंगनाथ नाईकडे

 

शनिवार रविवार आले म्हणजे कोणताही बाहेरगावी काम करणारा अधिकारी हा आपल्या गावाकडे वळतो. दोन दिवस परिवारात राहतो आणि सोमवारी आपल्या कामावर रुजू होतो. या नियमाला काही अधिकारी अपवाद आहेत. तो अपवाद म्हणजे हरिभक्त पारायण श्री रंगनाथ नाईकडे यांचा. खरं म्हणजे ते आयएफएस म्हणजे सनदी अधिकारी आहेत. पण आपला प्रत्येक शनिवार रविवार ते समाजासाठी देतात .दोन दोन तीन तीन महिने त्यांचे शनिवार रविवार हे लोकाभिमुख कामासाठी राखीव असतात .कोणतेही मानधन नाही. कोणताही प्रवास खर्च नाही आणि कोणतीही सुविधाही अपेक्षित नाही. असा हा हरिभक्त परायण माणूस आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या सामाजिक संस्थांमध्ये पोहोचला आहे . ते तुमच्यामध्ये इतके मिसळून जातात ते सनदी अधिकारी आहेत हे विसरून जातात. संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी जागे करण्याचे काम हा माणूस गेल्या कित्येक वर्षापासून करीत आहे .अगदी गडचिरोलीपासून तो गोव्यापर्यंत. कितीही लांबचा प्रवास असो .तारीख खाली असली तर ते कधीही नाही म्हणणार नाहीत .शुक्रवार संपला की त्यांचा सामाजिक कार्याचा प्रवास सुरू होतो आणि सोमवार सुरू झाला की आपल्या कार्यालयात हजर .समाजासाठी इतका वाहून घेतलेला अधिकारी मी आजपर्यंत पाहिला नाही. कित्येक वर्ष साहेब मुंबईच्या मंत्रालयात मंत्र्यांचे पीएस होते. मंत्र्यांचे पीएस असताना जेवढे लोकाभिमुख कामे असतील तेवढे त्यांनी मार्गी लावली. मंत्रालयातून ते कोल्हापूरला उपवनसंरक्षक म्हणून रुजू झाले. माझे एक काम समाज कल्याण मंत्री श्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे निघाले .साहेब याच मंत्र्यांचे पीएस म्हणून यापूर्वी काम करीत होते. माझ्या कामासाठी साहेब कोल्हापूरहून मुंबईला आले. आम्ही शिवाजीराव मोघे यांच्या कार्यालयात पोहोचलो. ते जेवण करायला बसले होते. साहेब मला डायरेक्ट त्यांच्या खाजगी चेंबरमध्ये घेऊन गेले. शिवाजीराव मोघे जेवण करायला सुरुवात करणार .तत्पूर्वीच रंगनाथ नाईकडे यांनी माझा परिचय करून दिला आणि माझा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला .प्रस्ताव मोठा होता. पण मंत्र्यांनी काही सेकंदामध्ये त्या प्रस्तावावर सही केली. . माझे काम मार्गी लावून ते कोल्हापूरला परत गेले. डॉक्टर पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमीने मिशन आय ए एस अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर सभागृहात तिसरे विदर्भ स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन घेतले होते. या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भाषण देण्यामध्ये कीर्तन करण्यामध्ये ते तज्ञ आहेत. त्यांच्या वर्तुळात हरिभक्त पारायण म्हणून ते ओळखले जातात. नागपूरला प्रादेशिक वनसंरक्षक म्हणून ते कार्यरत होते. आमचे दरवर्षी अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये म्हणजे गुरुकुंज मोझरी येथे स्पर्धा परीक्षा शिबीर होते . मी या शिबिराचे निमंत्रण त्यांना दिले. ते तेव्हा शिवाजीराव मोघे यांचे पीएस होते. एवढ्या कामाचा व्याप असतानाही त्यांनी मला वेळ दिला .ते मुंबईवरून अमरावतीला आले आणि मला म्हणाले मी गुरुकुंज मोझरीसाठी निघत आहे .आम्ही सर्वजण गुरुकुंज मोझरीच्या महाद्वारावर साहेबांची वाट पाहत बसलो .आता लाल दिव्याची गाडी येणार. साहेब उतरणार .अशी मनात मांडणी केली. आम्ही जिथे उभे होतो तिथे एक ड्रायव्हिंग स्कूल ची व्हन थांबली .त्यावर पुढे मागे बाजूला ड्रायव्हिंग स्कूलची जाहिरात होती .त्या व्हॅन मधून चक्क आय एफ एस अधिकारी उतरले .ते म्हणजे श्री रंगनाथ नाईकडे .आम्ही पाहतच राहिलो.साहेब म्हणाले हा ड्रायव्हिंग स्कूलवाला आमच्याकडे एक प्रोजेक्ट घेऊन आलेला आहे. तो म्हणाला माझ्या गाड्या खूप चांगल्या आहेत .मी म्हटलं चल मी तुझ्या गाडीची टेस्ट घेतो. आणि गाडी इथपर्यंत घेऊन आलो. साहेबांच्या दिमतीला अनेक एसी गाड्या असताना साहेब ड्रायव्हिंग स्कूलच्या मारुती व्हॅन मधून गुरुकुंज मोझरीला आले होते .इतके साधे सरळ त्यांचे काम आहे .त्यांच्या चालण्याचा वेग आणि कामाचा वेग देखील पाहण्यासारखा आहे. परवा पुणे येथे यशदा मध्ये मी त्यांना भेटायला गेलो. मी येणार म्हणून साहेब कार्यालयाबाहेरच माझी वाट पाहत थांबले. मला जास्त शोधाशोध करावी लागू नये म्हणून हा एवढा मोठा अधिकारी माझी वाट पाहत थांबला .योग्य आदरतिथ्य केले. अल्पोपहार झाला .चहापाणी झाले.मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन उपसचिव व सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री शेखर गायकवाड यांची माझी भेट करून दिली .मला यशदामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आणि मी जेथे थांबलो आहे तेथे मला सोडून देण्यासाठी स्वतःची गाडी काढली. ते कोल्हापूरला कार्यरत असताना माझ्या त्या भागात मिशन आयएएसच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा झाल्या. साहेब तेव्हा कोल्हापूरला त्या विभागाचे उपवनसंरक्षक होते. ते मला घरी घेऊन गेले .त्यांच्या घरी मला जेवू घातले. वहिनीसाहेबांची भेट करून दिली आणि जाताना एक स्मरणीय भेटवस्तू दिली. त्यांच्या प्रेरणेमुळे व त्यांच्या व्याख्यानामुळे व त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज अनेक विद्यार्थी आयएएस आयपीएस सनदी व राजपत्रित झालेले आहेत. साधारण 40 वर्षापासून ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेत आहेत. मुलांना जागे करीत आहेत. त्यांचे भाषण म्हणजे बोलके भाषण असते. कंटाळवाणे नसते. कीर्तनाचा त्यांना अति छंद आहे .म्हणूनच लोक त्यांना हरि भक्त पारायण म्हणून ओळखतात. त्यांच्या कीर्तनाला त्यांच्या परिवाराचा वारसा आहे .आपल्या परिवाराचा कीर्तनाचा वारसा ते समर्थपणे पुढे चालवित आहेत . कीर्तनकारासारखा पेहराव करून ते कीर्तन करून तल्लीन होतात. आपण फार मोठे सनदी अधिकारी आहोत ते विसरून जातात. साहेब आमच्या कार्यक्रमाला तर येतातच .पण त्यांचे जे मित्र सनदी अधिकारी आहेत त्यांनाही ते आठवणीने डॉक्टर पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमीच्या मिशन आयएएस च्या कार्यक्रमाला पाठवितात. मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे .ते मला गुरुदेव म्हणतात. मी त्यांना फोन केला तर ते म्हणतात. गुरुदेव काय आदेश आहे .मला संकोचल्यासारखे वाटते. त्यांना माहीत आहे .काठोळे सरांचे काम हे सार्वजनिक स्वरूपाचे असते. व्यक्तिगत नसते .सनदी अधिकारी असल्याचा अहंकार त्यांच्या मनातून केव्हाच गळून पडलेला आहे. खरंच असे सनदी अधिकारी फार कमी असतात. अशा ह्या सामाजिक बांधिलकीच्या सनदी अधिकाऱ्याला आमचा हा मानाचा मुजरा…

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा