ठाणे :
२९ सप्टेंबर २०२४ रोजी ठाणे येथील एम. एच. हायस्कूल सभागृहात *गझल मंथन साहित्य संस्थेच्या ठाणे जिल्हा, कोकण विभाग कार्यकारिणी* द्वारे आयोजित रंगलेले गझल संमेलन म्हणजे खरोखरीच एक अस्सल गझलमय अनुभूती होती. सभागृहात पाय ठेवल्यापासूनच सर्व गझलकारांच्या गराड्यात मनाला घेरून बसलेल्या एकेका शेराची संसंवेद्य जाणीव होत होती आणि या सर्वाचा आपण एक भाग आहोत या अनुभूतीने ह्रदय वरचेवर भरून येत होतं, अगदी डोळ्यातून ते टपकतंय का काय… इतपत!!!
सभागृह कार्यक्रमासाठी सु..सज्ज होतं.यासाठी अगदी स्वतःला झोकून देऊन विशेष परिश्रम घेणाऱ्या ठाणे जिल्हा प्रमुख मानसीताई आणि सर्व ठाणे कार्यकारिणी सदस्य कोकणविभाग प्रमुख मनोज वराडे सर यांचे सुरवातीलाच मनापासून कौतुक करते कारण from start to end.. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड पदोपदी जाणवत होती.
त्या गझलमंदिरात मृदू शब्द निनादू लागले. सुप्रिया हळबे हिच्या गोड आवाजातील सूत्रसंचालनाला सुरवात झाली अन् गझलमय वातावरणाला आणखी रंग चढला. तिच्या हसत, खेळत पण अभ्यासू आणि नेमक्या सूत्रसंचालनामुळे या संमेलनात एक वेगळंच चैतन्य आलं.मंगलमय दीपप्रज्वलन होताहोताच कानावर पडणारे आ. संपदा दळवी यांचे अत्यंत मधुर स्वागतगीत… काय बोलावं! ती फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे.संमेलन उदघाट्नाचा हा अनुपम सोहळा.. एक हृद्य आठवण!!
त्यानंतर उदघाटक आ. प्रमोददादा खराडे, प्रमुख पाहुण्या आ. उर्मिलामाई बांदिवडेकर आणि संमेलन अध्यक्ष आ. प्रशांतदादा वैद्य या सर्वांना ऐकणे म्हणजे गझलवाटेवरील आंबट – गोड फळे वेचण्याची दुर्मिळ संधी होती.जी गझलनिष्ठा म्हणजे काय.. याचे मूर्तिमंत उदाहरण होती.स्वतःच्या आईची तब्येत ठीक नसतानाही गझलेच्या प्रेमापोटी प्रशांतदादांनी संमेलनाला लावलेली हजेरी आणि आईच्या आठवणीने त्यांना गहिवरून येणं… किती हळवं, किती कातर..!! यानिमित्ताने मलाही सर्वांशी *गझलसंवाद* साधण्याची संधी मिळाली.रसिकांनी माझे शब्द कान गोळा करुन ऐकले, कौतुक केलं त्याचबरोबर आ. वैभव जोशी सर “स्नेहलजी छान बोललात”… म्हणाले. गझलेचे माझ्यावरचे हे अमूल्य ऋण कसे अदा करू…?
गझलमंथनच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्काराचे पहिले मानकरी.. सेलिब्रेटी गझलकार, गझल सेलिब्रेटी आ. वैभव जोशी सरांचे सभागृहातील आगमन गझलरंग अधिक गहिरा करत गेले.मनोज वराडे सरांनी सरांचा करुन दिलेला परिचय,जयवंत वानखेडे सरांनी केलेले पुरस्काराचे प्रास्ताविक आणि मानसीताईंनी केलेले सन्मानपत्र वाचन.. सगळंच वैभव जोशी सर आणि गझल मंथन बद्दलचा अभिमान द्विगुणित करणारे..!!
पुरस्काराला उत्तर देणारे वैभव सरांचे मनोगत म्हणजे एका लावण्यखणी गझलहृदयाची पारदर्शक ओळख होती.त्यांच्या गझल, कविता, गीते… अगोदरपासूनच खूप आवडत होती. पण या संमेलनात एक व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला.या संमेलनासाठी त्यांनी दिलेला वेळ, आम्हा सर्वांमधला त्यांचा अगदी सहज, विनम्र, मनमोकळा वावर…सभागृहातील प्रत्येकाला जीवनमूल्याधिष्ठीत खयालांबरोबर विनम्र दिक्षा देऊन गेला.
यशाच्या सर्वोच्च पायरीवर असताना इतकं down to earth राहणं केवळ साधकांनाच जमू शकतं.
पुरस्कार स्वरूपात त्यांना दिला गेलेला अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश त्यांनी गझल मंथनच्या पुढील कार्यासाठी देणगी स्वरूपात दिला. ही गोष्ट त्यांची गझलनिस्पृहता अधोरेखित करते.
त्यांची भेट, त्यांच्या गझल जवळ बसून ऐकणं सगळंच प्रचंड आनंददायी होतं.
त्यांच्या अध्यक्षतेखाली, आ. ज्योत्स्नाताई रजपूत यांच्या सूत्रसंचालनाने अधिकाधिक बहरत गेलेला आ. प्रशांत वैद्य, आ. प्रमोद खराडे, आ. उर्मिलाताई बांदिवडेकर, आ. जयवंत वानखेडे, आ. उत्तरा जोशी, आ. चंद्रकांत धस आणि मी.. या निमंत्रितांचा गझल मुशायरा…. केवळ अविस्मरणीय!!!
सकाळच्या उत्कृष्ट चहानाश्त्यानंतर दुपारचं रुचकर जेवण… खरंच ठाणेकरांनी मनाबरोबर सर्वांची भूकही तृप्त केली. आणि हे सगळं अतिशय शांतपणे, कसलीही गडबड गोंधळ न होता,संथपणे सुरु होतं…जे अधिकच आवडून गेलं.
जेष्ठ गझलकार आ. साबीर सोलापुरी सर, आ. वैशाली शेंबेकर मोडक, आ. रत्नमाला शिंदे, आ. मानसीताई जोशी यांच्या अध्यक्षतेखाली.. गझलकारा आ. सुनेत्रा जोशी, आ. मुग्धा कुळये,आ. डॉ. सुजाता मराठे, आ. डॉ. मनोज वराडे यांच्या सूत्रसंचालनाने अधिकाधिक बहरत गेलेले दूरदूरहून आलेल्या गझलप्रेमी गझलकारांचे मुशायरे, त्यांनी गाजवलेलं व्यासपीठ पंचेंद्रीयांनी साठवून ठेवावं असं… अलौकिक!!
गझलमंथन मार्गदर्शक समितीचे आधारस्तंभ डॉ. शिवाजी काळे यांचे नेहमीच होणारे मोलाचे मार्गदर्शन,आ. गझलकार मुकुंदराव जाधव यांनी तयार केलेली पत्रिका, आ. सुभाष कटकदौंड यांनी दिलेली पुस्तके… ज्या ज्या हातांची या संमेलनाला मदत झाली त्या सर्व हातांचे आभार!
उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे नाव घेणे शक्य नाही पण सर्वांप्रती तितकाच प्रेमभाव, तितकाच आदरभाव आहे आणि गझलकार शब्दाच्या छत्राखाली असलेलो आपण सर्वजण एकच आहोत, एकत्र आहोत . हो ना.. 😊
त्यामुळे गझलेच्या प्रेमापोटी आपणहून आलेल्या, केवळ एका फोन कॉल वर आलेल्या सर्वांचे गझलमंथन साहित्यसंस्थेतर्फे मनापासून आभार 🙏🏼
कशाकशाबद्दल आणि काय काय लिहायचं… लेखणी थांबतच नाहीय.
यावर कहर म्हणजे सुप्रसिद्ध गझलकार निशांत गुरू यांच्या सहा सात वर्षाच्या नातवाने गायलेले काही शेर..गझलेचे, गझलमंथनचे पुढचे, देखणे, आगेकूच करणारे पाऊल…!!
गझलमंथन बिजाचे अल्पावधीतच वटवृक्षात झालेले हे परिवर्तन पाहणे, खूपच सुखावह असले तरी हा प्रवास निश्चितच इतका सोप्पा नव्हता. गझल मंथनचे अध्यक्ष आ. अनिलदादा कांबळे, सचिव जयवंत वानखेडे सर, आ. वसुदेव घुमटकर ( देवकुमारजी ) आ. उमा पाटील यांच्या आंतरिक तळमळीचे व कठोर परिश्रमाचे हे फलित आहे.
केवळ प्रस्थापित गझलकारांना व्यासपीठ मिळवून न देता नवोदितांना संधी देऊन त्यांना प्रोत्साहित करणारी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी अशी संमेलने हे गझलमंथनचे वेगळेपण आहे आणि हीच गझलमंथनची खरी ओळख आहे.ही शिदोरी घेऊन संमेलनातून बाहेर पडताना पावलांपेक्षा काळीज जास्त जड झालं होतं……
गझलमंथनच्या भावी स्वप्नपूर्तीसाठी मनापासून शुभेच्छा….!!!
.. डॉ. स्नेहल कुलकर्णी