You are currently viewing माझे गाव कापडणे…

माझे गाव कापडणे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*३८) माझे गाव कापडणे….*

 

कसं असतं पहा, ही गरीबी फारच वाईट

असते पहा. आता…कुठे जन्म घ्यावा हे हातात

नसतेच, शिवाय पूर्वी लोकसंख्या निवारणा

बाबतही एवढी जागृती नव्हतीच. त्यामुळे बऱ्या

पैकी मोठी कुटुंबे सर्वत्र होती. आमच्या भाऊबंधातही हीच परिस्थिती होती.७/८ मुले

एका कुटुंबात असत. सहा बहिणी तीन भाऊ

असे. विचार करा, आज आपण इतक्या मुलांची कल्पना तरी करू शकतो का? नुसत्या

विचारानेही आपल्याला घाम फुटतो. अहो, एक

एक मुल वाढवून त्याला मार्गी लावणे चेष्टा आहे का हो?

 

या लहरी निसर्गाच्या पार्श्वभूमीवर ९ मुलांची

लग्ने, त्यांचे शिक्षण, मुलींना हुंडा, त्या बापाने कितीही कमावले तरी कसे पुरणार हो? म्हणजे

मुले लहान असतांना सुस्थितीत असलेली ही

कुटुंबे जसजशा मुलांच्या गरजा वाढू लागल्या

व मुली वयात आल्या तेव्हा या कुटुंबांची चणचण व ससेहोलपट मी जवळून पाहिली आहे. शिक्षणाची तर दृष्टीच नव्हती. “ हं ..

कोनता सायेब बनाव से कायजन? “ असे

उपहासाने बोलले जायचे.म्हणजे चार भावांपैकी तुटपुंजी शेती असल्यामुळे दोन

सालदारकी करणार व दोन शाळेत जाणार.

डोक्याने बरा असेल तो शिकणार व दुसरा

शाळा अर्धवट सोडून घरी बसणार. त्यातून

एकेका मुलीचे लग्न काढावेच लागते, तो खर्च.

अशाने ही कुटुंबे मी अगदी मेटाकुटीला येऊन

अनेक वर्षांनी आपण ज्याला भंगणे म्हणतो म्हणजे दारिद्र्य येणे म्हणतो तशी त्यांची गत

झालेली मी पाहिली.

 

आमच्या भाऊबंदातलीच ही मंडळी आहेत व त्यांचे चढ उतार मी तेव्हा लहान असले तरी आज त्याची विसंगती व सुसंगतीही मला जाणवते. आई आणि मोठ्या मुलीची बाळंतपणे एकाच वेळी एकाच घरात होत असत. १४/१४ मुले होऊन एक दोनच मुले जगणारी पाहणारे दुर्भागी आईवडीलही त्यात होते.वडील, दोन मुले सालदारकी करणार. त्या काळात सालभराचे मिळणारे पैसे ही एवढ्या मोठ्या कुटुंबाला कसे पुरणार? कमावणारे तीन व खाणारे डझनभर! कसे पुरणार अन्न?

 

अशा वेळी घरातल्या गृहिणीची मोठी ओढाताण होत असे. अर्थात तेव्हा मला हे सर्व कळत नव्हते.

आमच्या घरी सालाने काम करणाऱ्या सालदाराच्या घरी मी त्यांचा दुपारचा डबा म्हणजे कपड्यात बांधलेली भाकरी न्यायला

जात असे.तेव्हा त्या घरातले चित्र मला दिसत

असे. ओट्यावर बकऱ्या बांधलेल्या. त्यांच्या

लेंड्या ओट्यावर विखुरलेल्या. काही बच्चे

बें बें करत टोम्याखाली झाकलेले,चुलीवर भाकरी बडवणे चालू, असे ते दृश्य असे.गाठोडं

तयार असेल तर उचलायचे व चालू लागायचे नाही तर मग भाकरी बांधे पर्यंत रेंगाळायचे.

 

भाकरी होताच भाजी भाकरी ती गृहिणी बांधून

द्यायची व मी घरचा रस्ता धरायची. असे दोन-चार घरी मला जावे लागायचे. कधी या घरांमध्ये पुरेसे पीठ नसायचे. सर्वांचेच जेवण

अपुरे व्हायचे. भुक तर पोटात खूप असायची.

तसे हे चहाचे खूप शौकीन. तेव्हा गरीबाघरी

साखर नसे. गूळ असे. सर्वत्र गूळच वापरला

जायचा. आता साखरेचे मूळ जाऊन गुळाचे

खुळ आले ते बरे झाले आहे. गाढवाला गुळाची

चव काय? अशी परिस्थिती होती सर्वत्र. आम्ही

लहानपणी सारे गुळाचेच पदार्थ खात होतो ती

क्रेझ आता नव्याने आली आहे. गुळाचीच जिलेबी व पुरणपोळी ही गुळाची. मडक्यात

काकवी गुळाची. तांदुळाची बर्फी गुळाची. साखर फक्त पाहुण्यांना. वाह रे वा! त्यांच्या

घरातल्या चहावरून मला एवढे आठवले.

 

या घरी दररोज रात्री हंडाभर चहा उकळायचा.

पण गरिबी मुळे कधी चहा पावडर नसे, कधी

गूळ तर कधी दूध तर नसेच नसे. पोटातली भूक

चहा मागायची. चहा तर हवाच. मग कधी दूध

तर कधी चहा पावडर मागायला कोणीतरी यायचे. “अक्का, जरासी चहानी भुकटी दे वो माय”… मला वाटायचे, रोजच का चहा लागतो

या मंडळींना? मी लहान होते, तरी नेहमीची त्यांची वारंवार होणारी मागणी माझ्या लक्षात

यायची. मग मी अक्काला विचारायची. तेव्हा या चहा मागचा कार्यकारणभाव आता कुठे मला समजला. अगदी चहा त्यांना जीव की प्राण होता असे म्हणू या ना! म्हणून म्हटले, गरीबी फार वाईट असते, कुणाच्याही वाट्याला येऊ नये व आलीच तर कुठलीही लाज न बाळगता आपण कष्टाने तिला परतवली पाहिजे. लाज गरिबीची वाटू द्यावी नि तिला पळवून लावावी.हाच खरा पुरूषार्थ आहे.

 

पुढे त्या कुटुंबातला मोठा कर्ता मुलगा जो आमच्याकडे रोजंदारीवर काम करायचा तो

विहिरीत पडून गेला. मी खूप लहान होते. खेडे गांव. चर्चेला उधाण आले. पडल्यावर घरी सांगावा आला. विहिरीच्या आसपास कोणी

होते की नाही माहित नाही. घरून लोक जाई

पर्यंत सारे संपलेले होते. गल्लीत सन्नाटा पसरला. सारे भयभीत झाले. लग्नही झालेले

नव्हते ते बरेच म्हणावे लागेल. कितीतरी दिवस

गल्लीत सालदार लोक चर्चा करत. रात्रीचा

तो इथे दिसला. तिथे दिसला. मी ऐकायचे नि

भितीने माझी पाचावर धारण बसायची.

त्याला आणले व लगेच वाटे लावले. एकच आक्रोश पसरला.पुन्हा नदीवर आंघोळी, ज्याची मला खूप भिती वाटायची. नदीवर कपडे न्यायचे मला मोठे संकट पडत असे.

पण करावेच लागायचे, मीच लहान नि घरात

एकटी होते. बाकी भावंडे धुळ्यात शिकत होती.

लहानपणी या गोष्टींचा मनावर खूप परिणाम होतो जो आजही मी विसरलेले नाही. ते प्रसंग

मला आजही तसेच्या तसे डोळ्यांसमोर दिसतात. आमच्या अंगणात बैलगाडी सोडलेली असायची. त्या रिकाम्या गाडीवर

बसून सालदार अक्काशी कध कधी गप्पा

मारायचे व मी आजूबाजुलाच असल्यामुळे

माझ्या कानावर त्या पडत असत.

 

त्याच घरात पाच बहिणी होत्या. शाळेतही जात व काम ही करत असत. नंतरच्या मुलाचे

मग लग्न झाले. खाणाऱ्या तोंडात आणखी भर

पडली. आता सून स्वयंपाक करू लागली.घरातली कर्ती बाई मायाळू असल्यामुळे मला तिथे भांडणे झालेली आठवत नाही.माझे वडील तेव्हा खादीभांडाराचे

काम बघत असत. आमच्या गावात साधे चरखे

व नंतर अंबर चरखे आणून या गरीब कुटुंबांना

त्यांनी चांगलाच रोजगार मिळवून दिला होता. त्यामुळे कुटुंबातल्या प्रत्येकाचा आपल्या घराला हातभार लागत असे.

 

पुढे सर्व मुलींची लग्नेही झाली. सुस्थळी आहेत. त्यांच्या घरात एक मुलगा खूप हुशार

होता. पण परिस्थिती खूप वाईट असल्यामुळे

धुळ्याला शिकायला ठेऊ शकत नव्हते. मग या

मुलाने रोज सायकलवर धुळे- कापडणे असे

रोज १२/१४ किलो मिटर रोज जाऊन येऊन अपडाऊन करत “डी सी ई “केले व तो नोकरीला लागला. तोपर्यंत मी ही धुळ्याला शिकायला आले होते. म्हणून माझा संपर्क तुटला. तरी त्याचे छान चालल्याचे कळत होते. लग्नही झाले. नंतर एकदा त्याच्याशी भेटही झाली.

 

मी आता विचार करते, ज्या कुटुंबात अशी एक दोनच मुले शिकून पुढे जातात त्या कुटुंबाचे

त्या शिकणाऱ्या मुलांसाठी केवढे मोठे योगदान

असते. ते शिकतात, नोकरीला लागतात, दर महिन्याला पगार येतो. ही मुले पुढे आपल्या कुटुंबाला कितपत उपयोगी पडतात? हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. तो शहरात

राहतो. त्याचे कुटुंब वाढते, गरजा व खर्चही

वाढतो हे सारे खरे असले तरी त्या त्याच्या

कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्यासाठी त्याचा कितपत उपयोग होतो? डॅा. आनंद यादव यांची सारी पुस्तके (झोंबी नांगरणी ते गोतावळा पर्यंत वाचल्या नंतर) व उत्तमराव

कांबळे यांचे” आई समजून घेतांना”वाचल्यावर

कोणाच्याच अपेक्षा पूर्ण होत नाही हे लक्षात

येते. अर्थात याला अनेक बाजू आहेत.घरच्यांना

वाटते याने सतत पैसे पाठवावे. शहरात राहून

तो मजा करतो वगैरे वगैरे..

प्रत्येकजण आपल्या जागी बरोबर असतो. तरी

कुणाच्याही अपेक्षा पूर्ण होत नाहीत हेच खरे.

 

“जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतसे भगवंत”

याचा अनुभव तर मी “याची देही याची डोळा”

घेते आहे. कर्म वाईट असेल तर तुम्हाला जाब

द्यावाच लागतो हे सत्यच आहे. माणूस

मोठा कुरापतखोर आहे. दुसऱ्याचे चांगले चाललेले असेल तर कुठे तरी त्याला ते दुखतेच. पण त्याचे भविष्यातले परिणाम इतके

भयंकर असतात तेच तेव्हा त्याला माहित नसतात. आमच्या बांधाला बांध शेत विक्रीला

निघाले नि वडीलांनी आडकाठी नको दुसऱ्याची,

म्हणून स्वत:च घ्यायचे ठरवले. तेवढ्यात कुरापतखोर चुलत आजोबांनी मघ्ये घुसून

त्यांना घ्यायची नव्हती तरी मीठाचा खडा टाकला व भाव वाढवून दिला. तरीही विहिरीत

भागिदारी व भानगडी नको म्हणून चढ्या किंमतीतही वडीलांनी तो मळा घेतला.आमचे

भविष्यात काहीही नुकसान झाले नाही. कारण

आम्ही सारेच नेकीने चालणारे आहोत. आमच्या मळ्यात, विहिरीवर सतत कुरापती करून त्यांचा फायदा तर झाला नाहीच पण

तिसरी पिढी अत्यंत टुकार निघून आमच्या डोळ्यादेखत एकेकाळी बऱ्यापैकी असलेल्या

कुटुंबाची पार वाताहत झाली, अगदी नको तितकी. म्हणून म्हटले इथेच, जाण्यापूर्वीच

सारे भरावे लागते. मंडळी, नेकीचा रस्ताच

फक्त सुखाकडे नेतो, हे पक्के लक्षात ठेवा.

कुणाचा दुस्वास करून आपणच रक्तबंबाळ

होतो. कौरवांचा एवढा मोठा इतिहास समोर

असून आपण काहीच शिकत नाही का?

शेजाऱ्याचा बांध कोरून डोक्यावर नेणार असाल तर खुशाल घेऊन जा, पण चित्रगुप्त

तिथेच लाथ मारून त्याच बांधावर तुम्हाला

पाडेल हे पक्के लक्षात ठेवा.

 

बरंय् मंडळी.. राम राम …

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा