पुणे :
साहित्य सम्राट पुणे संस्थेचे १९२ वे कविसंमेलन वारसा स्वराज्याचा नाणी संग्रहालय दिवेघाट, हडपसर सासवड रोड येथे माननीय विनोद ताम्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले होते. अखिल मराठी मनांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून कवी संमेलनाची सुरुवात झाली. साहित्य सम्राट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. साहित्य सम्राट संस्था स्थापनेचा उद्देश आणि ध्येय सांगत असताना त्यांनी संस्थेच्या साहित्य आणि समाज उपयोगी बारा उपक्रमांची माहिती दिली. नाणी संग्रहालयाविषयी कौतुक करताना ते म्हणाले की त्या त्या वेळेची भाषा आणि नाणी हे ऐतिहासिक संशोधनाचे प्राथमिक स्त्रोत आहेत. त्यामुळे हा अमूल्य ठेवा जपणे आपले आद्य कर्तव्य आहे. पुढे अष्टुळ यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रबोधनात्मक अभंगाची आठवण करून दिली.
जिभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी, वाणी, नाणी | नासू नये ||
यावेळी कवी संमेलनाच्या विचारपीठावर नाणी संग्रहालयाचे संग्राहक निर्माते विशाल जगताप, कार्यक्रमाचे निवेदक बबन चखाले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ आणि कवी संमेलनाध्यक्ष विनोद ताम्हाणे उपस्थित होते. स्वराज्याचा वारसा या नाणी संग्रहालयात ऐतिहासिक जागतिक नाण्यांचे ज्ञान घेत असताना आपल्या महापुरुषांच्या लेखणीचा वारसा सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. आपली लेखणी त्या महापुरुषांप्रमाणे समाज उपयोगी व्हावी. मी पहिली कविता सादर केली ती साहित्य सम्राट कवी संमेलनामध्येच आणि आज सर्व ज्येष्ठ साहित्यिकांसमोर मला माझ्या जीवनात पहिल्यांदा कवी संमेलन अध्यक्षांचा मान मिळाला. तो ही साहित्य सम्राट मुळेच.
या १९२ व्या कवी संमेलनामध्ये अनेक दिग्गज कवींनी विनोदापासून प्रबोधनापर्यंतच्या विविध रसातील काव्यरचनांनी संग्रहालयातील रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
निसर्ग सौंदर्याची आणि सीमेवरील शूर सैनिकांची उत्कृष्ट संबंध दाखवणारी कविता ज्येष्ठ कवी शाम लाटकर यांनी सादर केली ते म्हणतात
तो कुर्बानी देई सौख्याची, तो घेई काळजी स्वातंत्र्याची
तो घालूनच डोळ्यात तेल, इंच इंच सीमा लढवेल
का गर्वाने अंतरा फुलला घननिळा बरसुन गेला
का श्रावण अजून बोला घननिळा बरसून गेला
यानंतर विदर्भातील कवी प्रवीण वानखडे आपल्या कवितेतून सुखदुःखाविषयी म्हणतात-
शैली कुठली असली तरी भाषा अगदी सरळ आहे
कुठे सुखाचे अमृत तर कुठे दुःखाची गरळ आहे
पुढे खलील शेख यांनी वास्तवावर विचार करायला लावणारी भारदस्त कविता सादर केली ते म्हणतात –
कोवळ्या कळीचा तो काय दोष होता?
मुलगी म्हणून जन्मली का तिचा गुन्हा होता?
लगेचच ज्येष्ठ कवी दत्तू ठोकळे मानवतावादी विचार सांगणाऱ्या रचनेत म्हणतात –
हा अजून गेला नाही मीपणाच माझ्या मधला
मी माणूस शोधत आहे इथे माणसा मधला
शेवटी विनोद अष्टुळ ऐतिहासिक आणि वास्तवदावर विचार करायला लावणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील क्रांतिकारी विचारांची कविता सादर केली. त्यात ते म्हणतात –
शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे
तलवारीने सरळ आमचे शीर छाटावे
अशा एकापेक्षा एक दर्जेदार काव्यरचनांनी वारसा स्वराज्याचा संग्रहालय दणाणून सोडणारे जेष्ठ कवी गझलकार बबन धुमाळ, दत्तू ठोकळे, श्याम लाटकर, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, विनोद अष्टुळ, बबन चखाले, खलील शेख, प्रवीण वानखडे, राजेश कुंजीर, प्राजक्ता ताम्हाणे, प्रेम ताम्हाणे, मनीषा जगताप अशा कवी कवयित्रींनी रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांनी सभागृह दणाणून सोडले.
कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन बबन चखाले यांनी तर सर्व नाणी संग्रहालयाची माहिती आणि आभार संग्रहालयाचे निर्माते विशाल जगताप यांनी व्यक्त केले.