*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*
पुन्हा नव्याने
आपल्याला जेव्हा एकट एकट वाटत असतं तेव्हा खरं तर त्याला कारणीभूत आपण स्वतःच असतो. आपणच पुढे पुढे जाण्याच्या नादात मागचे पूल एकेक करत तोडून धावत असतो. मग पुन्हा जेव्हा मागं वळून पाहतो आणि पूल सांधायचा प्रयत्न करावा असं वाटायला लागतं तेव्हा दोघांच्यातले इगो इतके उंच गेलेले असतात की त्यांना पार करण अशक्य होऊन बसतं. खासकरून चाळीशी,पंचेचाळीशीनंतर…
त्यावेळी आर्थिक स्थैर्य आलेलं असतं. मुलं स्वावलंबी झालेली असतात किंवा होत असतात.नवरा बायकोनं एकमेकांच्या स्वभावाला चांगलच जोखलेल असतं.
शारीरिक आकर्षण कमी झालेल असलं तरी भावनिक सपोर्ट खूप हवाहवासा वाटत असतो. आपल्याला ज्या गोष्टीवर बोलायचे ती गोष्ट ऐकून समजून घेणारा उत्तम जोडीदार खूप कमी जणांना मिळतो. पुढे पुढे शारीरिक कुतरओढी बरोबरच मानसिक कुतरओढही चालू होते. या वयात शक्यतो मूड स्विंग अतिशय जास्त प्रमाणात होत असतात जे कोणीही समजून घेऊ शकत नाही आणि त्यातूनच येतं डिप्रेशन.
हेच ते वय असतं जेव्हा पुन्हा एकदा कुणाशी तरी मैत्री करावीशी वाटते. बोलावसं वाटतं. मनातलं सांगावसं वाटतं. कोणीतरी नवीन समवयस्क मित्र किंवा मैत्रीण अशी मिळावी वाटत जिथ आपण काहीतरी,, जे हरवत चाललं होतं ते शोधू शकू असं वाटतं.
यात अनैसर्गिक असं काहीच नाही. आपल्याला सगळ्यांनाच, लहानांपासून अगदी __ टेकलेल्या म्हाताऱ्यांपर्यंत सुद्धा कोणीतरी अशी जवळची व्यक्ती हवी असते की जी आपल्याला ‘ए वेडूल्या’ म्हणून कुरवाळून जवळ घेईल, आपले साधेच पण फालतू हट्ट मायेनं पुरवेल.
आपल्याला प्रेमाच्या धाकानं योग्य अयोग्य सुचवेल.
पुन्हा नव्याने वयाच्या एका टप्प्यावर आपल्याला लहान व्हायचं असतं. अटेंशन मिळवायचं असतं.स्वतःला पॅंपर करून घ्यायचं असतं. यात चुकीचं काहीच नाही फक्त आपण ते मान्य करायला हवं.
©®अंजली दीक्षित- पंडित
#anजियोग्राफी
#माझा_लेखनप्रपंच
#अंजली_रविकिरण