You are currently viewing ४ ऑक्टोबर पासून पारपोली येथे फुलपाखरू महोत्सव

४ ऑक्टोबर पासून पारपोली येथे फुलपाखरू महोत्सव

सावंतवाडी :

 

आंबोली घाटातील पायथ्याशी फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात शुक्रवार ४ ऑक्टोबर पासून दुसऱ्या फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापर्यंत चालणारा हा महोत्सव सिंधू रत्न समृद्ध योजनेतून आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत असून निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता होणाऱ्या या फुलपाखरू महोत्सवाच्या उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पारपोली गावात फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म असे वातावरण असुन फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्धतेचे वरदान आहेत. त्यामुळे सुमारे १८० प्रकारची विविध फुलपाखरे या गावात आढळतात. फुलपाखरांच्या जैवविविधतेने नटलेले पारपोली गाव फुलपाखरांच्या प्रजातीचे माहेरघर आहे. या गावात अतिशय दुर्मिळ आणि केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती यातील फुलपाखरांच्या बहुसंख्य जाती ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये या गावात आढळून येतात. मलबार, बँडेड पिकॉक, सर्दन बर्ड विंग, मलबार ट्री निंफ, मलबार रेवेन, मलबार स्पॉटेड प्लॅट अशा विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या जीवन चक्राचा अभ्यास करण्यासाठी निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी ही पर्वणीच आहे.

या महोत्सवात पारपोली ते आंबोली घाट या भ्रमंतीत जंगल व दरी खोऱ्यातील विविध दुर्मिळ वन्यजीवांची माहिती, उंच कड्यावरून कोसळणारे दुधाळ धबधबेही अनुभवता येणार आहे. यावेळी फुलपाखरू तज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली जंगलातील फुलपाखरांच्या माहितीसह त्यांचा जीवनक्रम व त्याबाबतचे ज्ञान व विज्ञान आणि तांत्रिक माहिती पर्यटकाना देण्यातयेणार आहे. तसेच आंबोली धबधबा, महादेव गड पॉईंट, कावळेसात पॉईंट, हिरण्यकेशी उगमस्थान, फुलपाखरू वन उद्यान याचाही आस्वाद घेता येणार आहे.तसेच या महोत्सवात पारपोली गावातील पारंपारिक घरात राहण्यासह पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आणि विविध पारंपारिक कला याचा आस्वाद घेण्याची संधी देखील पर्यटकांना मिळणार आहे. निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी चार महिने हा महोत्सव होणार असून गेल्या वर्षी या महोत्सवासाठी समाधानकारक नोंदणी झाल्यामुळे देशभरातील पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.या फुलपाखरू महोत्सवासाठी राज्याचे शालेय शिक्षण व भाषामंत्री दीपक केसरकर यांनीच पुढाकार घेतला त्यांच्या संकल्पनेतूनच हा महोत्सव होत आहे. या महोत्सवासाठी त्यांनी सिंधू रत्न योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. या फुलपाखरांच्या गावाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून अभिनेते दिगंबर नाईक यांची निवड करण्यात आली होती. राज्यातील पहिले फुलपाखराचे गाव म्हणून पारपोली गाव घोषित करण्यात आले. आता या महोत्सवातून या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षी या महोत्सवासाठी होम स्टे सुविधांसह तसेच विविध प्रकारचे स्टॉल मांडण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा