*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अर्धसमजाती*
*पादाकुलक + बालानंद*
(८-८ + ८-६)
*लेक*
शोभा असते लेक घराची
आनंद घरी नांदतसे
नाते दोन्ही घरी जोडुनी
अतूट बंधन बांधतसे
आई बापाच्या प्रेमाची
जाणीव तिला नित्य असे
सुख पायाशी पण माहेरा
ध्यान निरंतर तिचे वसे
संस्कारांचे पैंजण पायी
चुकता पाउल रुणझुणते
मायपित्याला दिधली वचने
क्षणात एका आठवते
दिल्या घराच्या सौख्यासाठी
कधी जीवनी दुःख पिते
परिस्थितीचा करुन सामना
दुःख पचवुनी सावरते
घरी पाहुणे अवचित येता
कुठे कशाला बावरते
काम कितीही तिला पडू दे
हसत मुखाने आवरते
किती अपेक्षा, कर्तव्यांचा
भार मनगटी पेलावा..?
आणि नोकरी, संसाराचा
रोजच गाडा ओढावा..?
जटील मजसी प्रश्न भासती
लेक सहजची सोडवते
ज्यांच्या पदरी नसते मुलगी
सून होउनी वावरते
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६