सोशल मीडियात मेसेज करणाऱ्या ‘त्या’ समाजकंटकांना शिक्षा व्हायलाच हवी…
मालवण मधील महिलांचे पोलिसांना निवेदन
मालवण :
मालवण मधील एका महिलेला सुड भावनातून जिवंत जाळले गेले, या प्रकरणावर आवाज उठवण्यासाठी मालवण मधील समस्त महिलांनी मोर्चा काढून आरोपीला कडक सजा व्हावी असे निवेदन मालवण पोलीस स्टेशन मध्ये दिले होते.
या घटनेचे बातमी प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आली. मात्र सोशल मीडियावरील त्या बातमीच्या खाली काही समाजकंटकाने खूप घाणेरडा पद्धतीने मृत महिलेची अवहेलना होईल अशा पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या.
अशा गोष्टी या समाजाला घातक असून अशा समाजविघातक प्रकृतींना वेळीच वेसण घालणे गरजेचे आहे, त्यामुळेच मृत महिलेचे बदनामी करणाऱ्या त्या व्यक्तीस तात्काळ अटक करून त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी असे निवेदन मालवण मधील समस्त महिला वर्गांनी एकत्र येऊन मालवण पोलीस स्टेशन येथे सादर केले आहे.
यावेळी पुनम चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, पल्लवी तारी, चारुशीला आचरेकर, पूजा वेरलकर, सोनाली पाटकर, मातृत्व आधार फाउंडेशन संस्थापक संतोष लूडबे, विशाल ओटवणेकर, दिलीप कासवकर, विद्या फर्नांडिस, महिमा मयेकर, निनाक्षी मेथर, मनीषा पारकर, मीनल पारकर, स्वाती पारकर आदी उपस्थित होते.