पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांशी विश्वासाचे नाते निर्माण करावे – हेमंत ओगले
मालवणात सिंधुविजय पर्यटन सेवा उद्योग सेनेचा शुभारंभ…
मालवण
मालवण, आंबोली यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय आज वृद्धिंगत होत पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटनातील अनेक गोष्टींवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांशी विश्वासाचे नाते निर्माण केल्यास पर्यटन व्यवसाय वाढीस अधिक चालना मिळेल. सिंधुविजय पर्यटन सेवा उद्योग सेनेच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आंबोली येथील फुलपाखरु तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिक हेमंत ओगले यांनी येथे केले.
मालवण मधील पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या सिंधुविजय पर्यटन सेवा उद्योग सेना या संस्थेचा शुभारंभ सोहळा भरड येथील मालवण हेरिटेज येथे झाला. यावेळी आंबोली येथील फुलपाखरू तज्ज्ञ व व्हिसलिंग वूड्सचे संचालक हेमंत ओगले यांच्या हस्ते या संस्थेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जलतरण प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे, ज्येष्ठ हॉटेल व्यवसायिक नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक रुपेश प्रभू, ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी नितीन वाळके यांनी प्रास्ताविक करत या नव्या संस्थेच्या स्थापनेमागील संकल्पना स्पष्ट केली. मालवणसह जिल्ह्यातील पर्यटनात दर काही वर्षांनी बदल होत आहेत. पर्यटनातील मूलभूत तसेच काळानुसार विविध समस्या पर्यटन व्यावसायिकांसमोर निर्माण होत आहेत. आर्थिक, विपणन, जाहिरात, तंत्रज्ञान तसेच पर्यटन सेवा देण्याबाबत भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत सामुदायिक पद्धतीने मार्ग काढण्यासाठी, त्यातून पर्यटन व्यवसाय वृद्धी होण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी वाळके यांनी सांगितले.
यावेळी हेमंत ओगले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मालवण जेटी समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविणाऱ्या पोहण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या लहान मुलांचे जलतरण प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जलतरण विषयावर गवंडे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी भाई गोवेकर, रुपेश प्रभू यांनी विचार मांडले. यावेळी पर्यटन विषयावर चर्चासत्र पार पडले.
यावेळी हरी खोबरेकर, रश्मीन रोगे, भगवान लुडबे, बाबी जोगी, दादा वेंगुर्लेकर, संजय गावडे, मनोज मेथर, पूनम चव्हाण, सेजल परब यासंह अनेक पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.