You are currently viewing पाऊस आणि आठवणी

पाऊस आणि आठवणी

*काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाचे सदस्य ज्येष्ठ लेखक अनिल देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*पाऊस आणि आठवणी*

 

आत्ता छान सगळीकडे पाऊस पडतोय .आणि

पाऊस आणि आठवणींचे काय नाते आहे देव जाणे! पण पाऊस आला की आठवणी येतात आणि आठवणींचा ही पाऊस मनात कोसळू लागतो! पावसासारख्याच आठवणींच्याही त-हा अनेक आहेत. कधी आठवणी इतक्या येऊन कोसळतात की त्यांची तुलना फक्त कोसळणाऱ्या पावसाशीच होते. तर कधी कधी त्या त्रासदायक असतात तर कधी आठवणी रिपरिप पडणाऱ्या पावसासारख्या असतात!आठवणी हळूहळू पण सतत येत राहतात, आणि मनाला बेचैन करतात! हे मात्र तेवढेच खरे ! रिप रिप पडणारा पाऊस जसा सावकाश पण सतत राहतो, तशा या आठवणी सतत येतात आणि मनाच्या चिखलात रुतून बसतात.

 

काही वेळा या आठवणी पावसासारख्याच लहरी असतात! कधी मुसळधार तर कधी तरल, विरळ अशा! कधीतरी अशा आठवणी वळवाच्या पावसासारख्या मृद्गंध देणाऱ्या असतात! तापलेल्या मनाला शांत करतात. या आठवणींच्या गारा टप् टप् मोठ्या पडणाऱ्या असतात पण जितक्या वेगाने पडतात तितक्याच लवकर विरघळून ही जातात! रिमझिम पडणारा पाऊस हा प्रेमाच्या आठवणी जागवतो ( असे म्हणतात ! )त्यांची रिमझिम माणसाला हवीशी वाटते! त्या आठवणींच्या रिमझिम पावसात माणुस चिंब भिजून जातो. पाऊस आणि आठवणींचा अन्योन्य संबंध आहे असं मला मात्र वाटतं !

 

पाऊस येत नाही तेव्हा सारं कसं उजाड, रखरखीत होतं! तसेच आठवणी किंवा भूतकाळ नसेल तर जीवन बेचव होईल. आठवणी या मनाला ओलावा देतात.पण हो, कधी कधी पावसासारख्याच या आठवणी बेताल बनतात. पाऊस कुठेही कोसळतो, पूर येतात तशाच त्रासदायक आठवणी काही वेळा माणसाचा तोल घालवतात .त्याला त्रासदायक ठरतात असं ही मला वाटतं !अतिरिक्त पावसासारख्या च त्याही नाश करत असतात .

 

पाऊस आणि आठवणी दोन्हीही प्रमाणात पाहिजेत, तरच त्याची मजा! कधीकधी ऊन पावसाचा खेळ होतो आणि इंद्रधनुष्य निर्माण होते! अगदी तसेच !जुन्या आठवणींना उजाळा देताना आपण अगदी आनंदून जातो. मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या आठवणी इंद्रधनुष्यासारख्या सप्तरंगात उजळतात. आठवणींच्या थेंबावर आपल्या मनाचे सूर्यकिरण पडले की त्यावर दिसणारे इंद्रधनुष्य मनाला लोभवते आणि आनंद देत रहाते !

 

अशावेळी आपलं मन इतके आनंदित बनते , जसे की पावसाची चाहूल लागली की मोराला आनंद होऊन तो जसा नाचू लागतो! तसे आपले मन रूपी मोर ही मनातल्या मनात नाचू लागते ! तेव्हां सुंदर आठवणींचा पाऊस मात्र आपल्या मनाला भिजवत राहतो. सृष्टीला जशी पावसाची गरज आहे तशीच आपल्यालाही छान आठवणींची गरज असते. नाही कां ? कधी मंद बरसत, कधी रिपरिप तर कधी कोसळत हा आठवणींचा पाऊस आपण झेलतच राहतो…झेलतच रहातो!…….भले आपआपल्या आठवणी वेगवेगळ्या असतील ! प्रसंग व स्थळे नक्कीच विविध असतील !

बालपणीतल्या पावसाच्या काही आठवणी आपल्या सर्वांच्याच चांगल्याच स्मरणात असतात .त्यातल्या त्यात ढग आणि वाऱ्याचे झालेले भांडण , आकाशातल्या म्हातारीने ( घरातल्या म्हाताऱ्या वरती आकाशातच का व कशासाठी जावून बसतात ? हा तेव्हां मला पडलेला बाल प्रश्न ! अजुनही अनुत्तरीत आहे..)पिंजून काढलेला चक्क काळाकुट्ट कापूस ,घराच्या आजुबाजुला निर्माण झालेल्या तळ्यात (खास)भिजायला येणारे सवंगडी आणि पावसानंतरच आकाशात (काहींना) दिसणारे इंद्रधनुष्य या व अशा बालपणीच्या आठवणी आपण चांगल्याच अनुभवलेल्या आहेत .

मला तर पहिल्या पावसानंतरचा तो मृद्गंध प्रत्येक पावसाळ्याच्या आधी हमखास आठवत असतो .

खरंतर प्रत्येकाच्या पावसाच्या आठवणी नक्कीच वेगवेगळ्या !वयानुसार , काळानुसार व गावानुसार भिन्न ! त्यातुन तरूणपणातले अनुभव (❤️)तर कदाचित् अविस्मरणीय !

त्या मानाने वयस्करांचे अनुभव म्या काय बरे सांगावे !

जळगावी वास्तव असतांना आमच्या शेजारी रहाणाऱ्या आजींची एक आठवण सांगतो , त्या आजच्या सारखा धो धो पडणारा पाऊस व वीजा चमकायला लागल्या की दारे खिडक्या बंद करून घरात स्वतःला कोंडून घेत असे .

 

तर एकदा मी जोऱ्याच्या वादळात अन् पावसात अक्षरशःसापडलो होतो ! सायकलवर होतो , प्रचंड कसरत करत , कधी सायकल तर कधी छत्री सांभाळत होतो ,छत्री तर अगदी ऊलटी झाली होतो , नखशिखांत भिजलो तर होतोच पण हातातल्या वह्या पुस्तके सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्नही करत होतो ! आणि आपला हा (अवतार !) कोणी पहात तर नाहीयेनं हे किलकिल्या डोळ्यांनी आजुबाजुला निरखत ही होतो !

मला तर पहिल्या पावसानंतरचा तो मृद्गंध प्रत्येक पावसाळ्याच्या आधी हमखास आठवत असतो .

खरंतर प्रत्येकाच्या पावसाच्या आठवणी नक्कीच वेगवेगळ्या !वयानुसार , काळानुसार व गावानुसार भिन्न ! त्यातुन तरूणपणातले अनुभव (❤️)तर कदाचित् अविस्मरणीय !

त्या मानाने वयस्करांचे अनुभव म्या काय बरे सांगावे !

आमच्या शेजारी रहाणाऱ्या आजी तर आजच्या सारखा धो धो पडणारा पाऊस व वीजा चमकायला लागल्या की दारे खिडक्या बंद करून घरात स्वतःला कोंडून घेत असे .

एकदा मी जोऱ्याच्या वादळात अन् पावसात अक्षरशःसापडलो ! सायकलवर होतो , प्रचंड कसरत करत कधी सायकल तर कधी छत्री सांभाळत होतो ,छत्री तर अगदी ऊलटी झाली होतो , नखशिखांत भिजलो तर होतोच पण हातातली वह्या पुस्तके सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्नही करत होतो ! आणि आपला हा (अवतार !) कोणी पहात तर नाहीयेनं हे किलकिल्या डोळ्यांनी ,अधून मधून टिपतही होतो !

तर आठवणी तशा खुपच आहेत व असतात ! पण आठवल्या त्या व सांगण्या सारख्या (?) त्या सांगितल्या .

कारण कसंय , कधी पाऊस हवाहवासा, तर कधी नकोसा ( ही)वाटतो !

कधी बेधुंद करणारा, तर कधी डोळ्यांसवे बरसणारा

कधी चातकासारखी वाट पहायला लावणारा,

तर कधी ‘ थांब एकदाचा’ असा त्रागा करुन म्हणायला लावणारा वाटतो.

‘पाऊस’ तसा असंख्य आठवणी जागवणारा,

तर कधी स्वतःबरोबर त्या वाहुन नेणारा!

पाऊस पहिल्या प्रेमात तिची ओढ लावणारा,

तर विरहात स्वतःबरोबर आक्रंदुन रडवणारा ही भासतो !

‘पाऊस’ तिला नखशिखांत भिजवुन आनंद देणारा,

तर त्याला तिने हट्टाने ओढण्याची वाट पहाणारा ही वाटत असतो !

 

तर असा हा पाऊस व आठवणी , आता तुम्हीच आठवा , अन् सांगा ,तुम्हाला कस कसा आठवतोय आपला पाऊस आणि त्यातल्या (गोड )आठवणी .….

*********************

 

-अनिल देशपांडे

पुणे ,

२५ सप्टेबर २०२४

प्रतिक्रिया व्यक्त करा