You are currently viewing अमरावती जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम महिन्यातून दोनदा स्पर्धा परीक्षा कार्यशाळा  

अमरावती जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम महिन्यातून दोनदा स्पर्धा परीक्षा कार्यशाळा  

 

आज आयएएस अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

 

अमरावती :

अमरावती जिल्हा परिषदेने महिन्यातून दोन स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्याचा संकल्प सोडला असून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद असेल. आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण प्रत्येक विद्यार्थी हा क्लासेस लावू शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन अमरावतीच्या कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता महापात्र यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्याचा चंग बांधला आहे. या उपक्रमाचे आज अमरावती जिल्हा परिषदेत रितसर सुरुवात झाली आहे. पहिल्याच कार्यक्रमाला सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी व अमरावतीला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले श्री अमर राऊत यांनी मार्गदर्शन केले. श्री अमर राऊत हे साताऱ्याचे असून त्यांचे सातवेपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वडूज हे त्यांचे मूळ गाव. वडील अध्यापक. गावात कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा नाहीत अशा परिस्थितीत त्यांनी आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण केली. आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपली यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. पुण्याच्या सुप्रसिद्ध शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ खाजगी कंपनीमध्ये नोकरी केली .पण त्या नोकरीमध्ये त्यांचे मन रमले नाही आणि त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला आयपीएस कॅडर मिळाला. हैदराबादला ट्रेनिंग सुरू झाले. पण त्यांना आयएएस व्हायचे होते. परत परीक्षेला बसले आणि आयएएस झाले. त्यांची ही यशोगाथा ऐकून कार्यशाळेला आलेले सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी स्तब्ध झाले. मराठी माध्यमात शिकलेला ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही प्रकारची दिल्लीची शिकवणी न लावता आयएएस होऊन आज अमरावतीला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेला आहे. आपल्या मार्गदर्शनात श्री अमर राऊत यांनी परीक्षेची तयारी कशी करायची कोणती काळजी घ्यायची नोट्स कशा काढायच्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यशाळेचे प्रास्ताविक सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर घाटे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे श्री अमर राऊत यांनी विद्यार्थ्यांना दिले. तसेच अमरावती शहरातील वेगळ्या महाविद्यालयामध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेबाबत जनजागृती करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता महापात्र ह्या आयएएस च्या परीक्षेतून दहावा क्रमांक घेऊन टॉपर आलेल्या आहेत. त्या ओरिसा या प्रांतातील असून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या नेहमी तत्पर राहतात. यापूर्वी अमरावतीच्या काही शाळांमध्ये जाऊन त्यांनी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतलेल्या आहेत. आपण तर आयएएस झालो पण अमरावती मधील तसेच अमरावती जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षा पास होऊ शकले पाहिजे त्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणाऱ्या ह्या मासिक कार्यक्रमाबरोबरच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या काही निवडक शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. आजच्या या तीन तासाच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून भविष्यात देखील या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा लाभ विद्यार्थी घेऊन यशस्वी होतील असा आशावाद व्यक्त होत आहे. त्यांनी राबविलेल्या ह्या उत्तम उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद परिसरामध्ये अधिकारी व कर्मचारी वर्गात समाधान दिसून येत आहे.

प्रकाशनार्थ

प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प.

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा