You are currently viewing सौरऊर्जेच्या माध्यमातून शाळांना वीजनिर्मिती करून देण्याचा उपक्रम स्तुत्य : रविंद्र चव्हाण

सौरऊर्जेच्या माध्यमातून शाळांना वीजनिर्मिती करून देण्याचा उपक्रम स्तुत्य : रविंद्र चव्हाण

जि.प. च्या ११ शाळांना रुफ टॉप ऑफ ग्रीड सौर ऊर्जा निर्मिती संचांचे वितरण

 

भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून उपक्रम

 

सावंतवाडी । प्रतिनिधी :

जागतिक ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक स्त्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली जावी तसेच देशात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेचा वापर करण्यात यावा अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसानिमित्त संदीप गावडे यांनी जिल्हा परिषद शाळांना मोफत सौर ऊर्जा निर्मिती संच साहित्य पुरविण्याचा घेतलेला उपक्रम निश्चितच सुत्य असून संदीप सारख्या ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत रुफ टॉप ऑफ ग्रीड सौर ऊर्जा निर्मिती संच साहित्य वितरण सोहळा येथील वैश्य भवन सभागृहात संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील ११ जि.प. शाळांना मान्यवरांच्या हस्ते सौर संचाचे वितरण करण्यात आले.

या सोहळ्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोव्याचे आमदार जीत आरोलकर , जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर, मानसी धुरी आदी उपस्थित होते.

या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मनोगतात संदीप गावडे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत शाळांना सौर ऊर्जा युनिट उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात संपन्न जिल्हा व्हावा यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आमची नेहमीच साथ लाभली आहे. कोकणच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी त्यांनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचाच कार्यकर्ता असलेले संदीप गावडे यांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी यावेळी पालकमंत्र्यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या तसेच उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

समाजाच्या हितासाठी कार्यरत असलेल्या संदीप गावडेंचा मला अभिमान : ना. रविंद्र चव्हाण 

प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यवसाय नोकरी करून पैसे कमवत असतो. मात्र, ज्या समाजात आपण मोठे झालो त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून त्या समाजासाठी काहीतरी करायला हवं असे मी सर्वच कार्यकर्त्यांना सांगतो मात्र त्याचं अनुकरण करणारे फार कमी असतात त्यातीलच एक संदीप गावडे आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा