मालवण
प्रत्येकांच्या आवडीनुसार अभिरुचीनुसार शिक्षण घेता आले पाहिजे यावर नव्या शैक्षणिक धोरणाचा भर आहे. उद्याचा सुजाण नागरिक घडविणे हे महत्वाचे उद्दीष्ट या नव्या शैक्षणिक धोरणाचे आहे. केवळ मुलांची गुणवत्ता सुधारण्यावर भर नाही तर त्याचबरोबर शिक्षकांची गुणवत्ता देखील सुधारली पाहिजे हा देखील विचार करण्यात आलेला आहे. म्हणून उद्याचा भारत घडविण्यासाठी नव्या शिक्षण पध्दतीची जी गरज होती ती आणली आहे, त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे बोलताना केले. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण, तर्फे आयोजित केलेल्या ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावरील व्याख्यानात विचार मांडताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे बोलत होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांनी सुरेश प्रभू यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच व्यासपिठावरील उपस्थित मान्यवरांचेही स्वागत केले. यावेळी व्यासपिठावर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, संस्थेचे सदस्य विजय केनवडेकर, संदेश कोयंडे, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर.एन. काटकर, डॉ. अविनाश झांट्ये, विलास हडकर, प्रा. हेमंत प्रभू आदि उपस्थित होते. यावेळी सुरेश प्रभू म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण ठरविताना पूर्व प्राथमिक पासून ते उच्चशिक्षणापर्यंत अनेक बदल सुचविले आहेत मुलांना स्थानिक भाषेतून चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठीची तरतूद या धोरणात आहे. प्रत्येक शाळा महाविद्यालयाची वाचनालये समृध्द व्हावीत आणि त्यातून ज्ञानवृद्धीला प्राधान्य मिळावे यासाठीचे प्रयत्न या नव्या धोरणात आहेत. अपेक्षीत ध्येय गाठण्यासाठी शाळा – महाविद्यालयांना पायाभूत मूलभूत सुविधा पुरविण्याकडे भर आहे. मुलांच्या हजेरीचा व त्यांच्या मानसिकतेचा विचार लक्षात घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. तसेच फक्त रस्ते, पाणी, वीज देवून भारत घडणार नाही तर सुजाण नागरिक घडविणे, त्यांच्यामध्ये देशाभिमान राष्ट्रप्रेम जागृत करणे व चांगला माणूस घडविणे ही खऱ्या अर्थाने गरज आहे. संशोधनाचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. मुक्त व दूरस्थ शिक्षणाला चालना मिळावी म्हणून या नव्या शैक्षणिक धोरणात विचार आलेला आहे असे विचारही प्रभू यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. कैलास राबते यांनी केले तर विजय केनवडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचा सर्व सेवकवर्ग व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.