You are currently viewing रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा…पण…

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा…पण…

*रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा…पण…,*

*अँब्युलन्स लोकार्पण सोहळ्याची एवढी प्रसिद्धी आणि अवाढव्य खर्च का..?*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येक राजकीय पक्षाकडून जनसेवेची स्पर्धा सुरू झाली असून पैसा खर्च करण्याची आणि जनसेवेचा इव्हेंट सादर करण्यासाठी चढाओढ पहायला मिळत आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जनसेवा म्हणजे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला इव्हेंट ठरत आहे. जेवढा खर्च जनसेवेसाठी होत नाही त्यापेक्षा जास्त खर्च केलेले काम जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी होत असल्याने ही खरोखर जनसेवा आहे की….? अशा उलटसुलट चर्चा लोकांमध्ये रंगताना दिसत आहेत. नक्कीच जिल्ह्याला आज आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. आजही सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्यावर अवलंबून असल्याने जनतेमधून संताप व्यक्त होत असतो. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अँब्युलन्सचे होत असलेले लोकार्पण हे स्पृहणीय कार्य असून त्याकरिता विशाल परब यांचे कौतुक करावे तेवढे कमीच..!
*परंतु…लोकार्पण इव्हेंट करणे आवश्यकच होते का..?*
रुग्णसेवा ही जनसेवाच आहे मग एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्यदिव्य मंचावर सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती तलावाच्या काठावर लोकार्पण इव्हेंट करणे आवश्यक होते का..? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित होत असल्याने निःपक्ष पत्रकारिता करताना त्यावर भाष्य करणे आवश्यक ठरते आहे.
सावंतवाडी मतदारसंघाचे भविष्यातील विधानसभा उमेदवार म्हणून स्पर्धेत असलेले विशाल परब यांना ही कल्पना सुचली हे नक्कीच कौतुकास्पद.. परंतु सुचली कशी..?
सांगेली येथील सामाजिक कार्यकर्ते बाबल आल्मेडा हे कलंबिस्त पंचक्रोशीत कोणी अत्यवस्थ अथवा मयत झाला तरी आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून ने-आण करतात. विशाल परब यांच्याशी कदाचित त्यांची चर्चा झाल्यावर सावंतवाडी मतदारसंघासाठी अँब्युलन्स देण्याचा स्तुत्य उपक्रम सुचला आणि विशाल परब यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात साकार केली. परंतु ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी व मतदारसंघातील आरोग्य सुविधा तंदुरुस्त करण्याच्या हेतूने करण्यात येणारा लोकार्पण सोहळा सावंतवाडी शहरातील मोती तलावाच्या काठावर करताना लाखोंची उधळपट्टी करून उभारलेला भव्यदिव्य शामियाना कशासाठी..? रिक्षामधून अँब्युलन्स लोकार्पण करायचे आहे तर त्याचा गाजावाजा, शो बाजी कशासाठी..? लोकार्पण सोहळ्यासाठी होणाऱ्या अवाढव्य खर्चात आणखी एखादी अँब्युलन्स आली नसती का..? त्यातून शेकडो हजारो लोकांना सुविधा देता आली नसती का..? असे एक ना अनेक प्रश्न होणाऱ्या लोकार्पण इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचो मसालो” अशी चर्चा चवीने चघळली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीच्या रणमैदानात एक दोन नव्हे तर तब्बल डझनभर इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे कोणाचा पत्ता चालणार आणि कोणाचा पत्ता कट होणार हे समजण्यापूर्वी प्रत्येक जण आपापल्या परीने वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न करत असून काही झालं तरी “मी लढणार” अशाच अविर्भावात जनतेमध्ये वावरत आहे. पुढील निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी खटाटोप करताना प्रत्येक जण वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असून “मीच जनतेचा कैवारी” असा दाखविण्याचा अट्टाहास करतो आहे. परंतु हे सर्व करताना या राजकीय नेत्यांकडे असे इव्हेंट करायला करोडो रुपये येतात कुठून..? जनता महागाईने होरपळून जात असताना लोकप्रतिनिधींकडे कुठल्या मार्गाने हे पैसे येतात..? कोणतेही मोठे राजकीय पद नसलेली व्यक्ती देखील तरुण वयात करोडो रुपये खर्ची घालते, ते पैसे आणते कुठून..? आपला हाच यशाचा मूलमंत्र हे लोकप्रतिनिधी जनतेला का देत नाहीत..? असेही प्रश्न करोडो रुपयांच्या उलाढाली आणि दिखाऊपणामुळे प्रत्येक नागरिकांच्या, जनतेच्या मनात उत्पन्न होत आहेत..आणि त्याची उत्तरे सुद्धा जनता शोधत आहे..
सावंतवाडी शहरातून जिल्हा रुग्णालय ओरोस येथे गेल्यानंतर शहरातील जिल्हा रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय म्हणून अस्तित्वास आले आणि तेव्हापासून शहरातील आरोग्य सुविधांची वानवा सुरू झाली. पूर्वी जिल्हाभरातून रुग्ण सावंतवाडी शहरातील जिल्हा रुग्णालयात येत होते आणि तशा सुविधा देखील रुग्णालयात होत्या. परंतु नंतरच्या काळात सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात कधी डॉक्टर उपलब्ध असले तर सुविधा नसतात अन् कधी चांगल्या सुविधा निर्माण झाल्या तर डॉक्टर उपलब्ध नसतात अशी परिस्थिती सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची आहे. आजही बरेच चांगले डॉक्टर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आहेत परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यावश्यक डॉक्टर जर कुठले असतील तर मधुमेह आणि हृदयरोग तज्ञ. परंतु सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कमतरता आहे ती चांगल्या एम डी फिजिशियनची. आज राजकारणाच्या गर्तेत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले आहे, भविष्यात कधी ते होईल न होईल परंतु अस्तित्वात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात चांगले कॉर्डियोलॉजिस्ट एमडी फिजिशियन आणण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. परंतु जनतेची गरज काय आहे याची माहिती करून न घेता किंवा त्याकडे कानाडोळा करून इतर बाबींकडे ध्यान दिले जाते आणि खऱ्या गरजा मात्र जिथल्या तिथेच राहतात.
सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग असो किंवा जिल्ह्यातील इतर कुठल्याही तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये जर कशाची आवश्यकता असेल तर ती चांगल्या आरोग्य सुविधा आणि अनुभवी तज्ञ डॉक्टर्सची.. अन्यथा सावंतवाडी मतदारसंघात अँब्युलन्स येतील.. सायरन वाजवीत गावागावातून रुग्ण सावंतवाडी शहरातील सरकारी रुग्णालयात आणतील आणि पुन्हा “ये रे माझ्या मागल्या”…आल्या पावली माघारी गोव्यातील बांबुळी अथवा कोल्हापूर जिल्ह्याकडे शरण जातील..
तिथे पोहचता पोहचता आजपर्यंत कित्येक रुग्ण प्राणास मुकलेत.. दैव बलवत्तर ते तरले परंतु…
राजकीय अनास्थेपोटी आजही जिल्ह्याची परिस्थिती ना आताच्या ना पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी बदलली ना पुढे बदलेल अशी आशा दाखवली..
दुसऱ्या राज्यावर, जिल्ह्यांवर अवलंबून बांडगुळ म्हणून जनतेला जगावयास भाग पाडायचे नसेल तर आणि तरच…
राजकारण्यांना एकच सांगणे…
*नको इव्हेंट नको शामियाना…*
*फक्त जनतेचे तुम्ही मन जाणा…*

प्रतिक्रिया व्यक्त करा