*लोक साहित्य परिषद हिंगणघाटचे सदस्य ज्येष्ठ लेखक कवी ज्ञानेश्वर चौधरी लिखित अप्रतिम लेख*
*अस्सल व-हाडी कवी: शंकर बडे*
अस्सल व-हाडी मातीतला अस्सल व-हाडी कवी म्हणजे स्व. शंकर बडे बाबा होय. व-हाडी कवी देविदास सोटे नंतर व-हाडीची पालखी वाहणारे कवी, म्हणजे स्व. शंकर बडे, प्राचार्य विठ्ठल वाघ, प्रतीमा ईंगोले, मीराताई ठाकरे, रजनी राठी, मिर्झा रफी अहमद बेग ही मंडळी पूढे आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ही व-हाडीची पालखी अलिकडे नितीन वरणकार, नितीन देशमुख, स्व.अरविंद भोंडे,राजा धर्माधिकारी, अनंत राऊत,अरुण मानकर,अझिझ पठाण,किशोर मुगल,गौतम गुडधे, गोपाल मापारी,अनंत खेळकर, संजय कावरे, पुरुषोत्तम गावंडे, नरेन्द्र ईंगळे,विठ्ठल कुलट, जयंत चावरे
प्रा. अभिजीत डाखोरे,प्रा.गिरधर काचोळे, निलेश तुर्के ईत्यादी कवी किस्सेकारांनी नेली आहे. आणि व-हाडीला साहित्यलंकारांनी सजावण्याचं काम ही मंडळी करीत आहे. प्रत्येकांनी आपापल्या परीने व-हाडीला वैभव प्राप्त करून दिले आहे. मिर्झा बेगची *मिर्झा एक्सप्रेस रसिकांच्या ट्रॅकवरून सुसाट धावत आहे.तर झी मराठी चॅनेलवर चला हवा येऊ द्या* या कार्यक्रमातून *भारत गणेशपूरे व तिखे* व-हाडीतून रसिकांना पोट धरून हसवित आहेत.
याच व-हाडच्या काळ्याकसदार मातीतला व-हाडीचा *मुगुट स्व.शंकर बडे* नि:खळ वाहणा-या अडाण नदी काठचा हा महाकवी खळ खळ निर्झरासारखा वाहला. व-हाडच्या काय अन् महाराष्ट्राच्या काय! काळ्या कसदार मातीत व-हाडी शब्द पेरत गेला. रसिकांच्या रसिकता सिंचनाने पाहता पाहता व-डीचं भरघोस पीकं आलं. भरघोस हंगाम सुरू झाला. व-हाडीच्या पीकानं शब्दाची कोठारं भरू लागली.
*बॅलिस्टर गुलब्या* या एक पात्री सादरीकरणाने विदर्भात धमाल उडवून दिली. प्रसिद्धीचे वलय नसल्याने फारसी प्रसिद्धी मिळाली नाही. पण डोक्यावर घेण्यासारखी ही अभिनयता होती. दत्ता काळेचं पात्र कवीवर्य *स्व. शंकर बडे* अफलातून रंगवत. कधी डोळ्यातून अश्रू तर लगेच हास्य विनोद हे *बॅलिस्टर गुलब्या* चं वैशिष्ठ्य. ईतर ही किस्से सांगताना ग्रामीण जीवनातले बारकावे हेरणे ही त्यांची संशोधनात्मक दृष्टी होती. ग्रामीण भागातील माणूस बाजाराला जातांना झो-याचे कसे न धरता झो-याची गच्ची कसा धरायचा हे साभिनय रसिका समोर मांडायचे ईतकं ग्रामीण जीवन रसिकासमोर मांडायचे. सणवार उत्सवाची दखल घेतांना ग्रामीण भागातील संस्कृतीचा वारसा सांगतांना ते भावूक व्हायचे. कुटुंबातील जिव्हाळा,परंपरा, चालीरिती जिव्हाळ्याने रसिका समोर सादर करायचे. वस्तरा लावण्याची कला किस्यातून मांडत. लावून झाल्यावर वस्त-यावर बोट फिरवून *फायनल जजमेंट* घेण्याची कला मांडतांना रसिक वर्ग हास्याची कंजूषी करत नव्हता. असे एक ना अनेक किस्से व व-हाडी कवितेचे सादरीकरण करायचे तेव्हा रसिकवर्ग सभागृह डोक्यावर घ्यायचा.
अतिशय सहजपणे वागणे व जीव ओतून किस्से कविता सादर करणे हे कसब लिलया आयुष्यभर जपले. माणसं जोडत कवितेतून माणूसकी पेरली. कष्टकरी,शेतकरी हा त्यांच्या कवितेचा आत्मा होता. कवितेतून नेहमी ग्रामीण संस्कृतीच झिरपायची.
हिंगणघाट ला चवदा वेळा ते आलेत व आम्हा रसिकांच्या मनात घर करून गेलेत. म्हणूनच लोक साहित्य परिषद हिंगणघाट *स्व.शंकर बडे* यांना साहित्यिक दैवत मानते. आकोटचा सोळा वेळचा विक्रम हिंगणघाट ला येऊन मोडीत काढायचा व नवा विक्रम स्थापित करायचा असा त्यांचा मानस होता. *बॅलिस्टर गुलब्या* या एक पात्रीचं हजारो रसिक प्रेक्षकांसमोर हिंगणघाट ला शुटींग करायचे हे त्यांनी व आम्ही ठरविले पण नियतीने हा डाव हाणून पाडला. १ सप्टेंबर २०१६ पोळ्याच्या दिवसी ते अनंतात विलीन झालेत.
व-हाडीचा *मुगुट* निखळला.
आम्ही असे दिवाने आम्हास गाव नाही
आम्ही घरा घरात आम्हास नाव नाही.
ज्ञानेश्वर चौधरी
सचिव
लोक साहित्य परिषद हिंगणघाट.
८६६८८१६०७५