कणकवली, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर काॅंग्रेसचा दावा – अरविंद मोंडकर
जिल्हा काँग्रेसची बैठक मुंबईत संपन्न..
मालवण
कुडाळ – मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक स्टैंडिंग सीट असल्याने हा मतदारसंघ शिवसेना ( उबाठा) पक्षाकडेच राहणार आहे. महा विकास आघाडी असल्याने जिल्ह्यातील इतर दोन मतदारसंघात सावंतवाडी प्रमाणे कणकवली हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने लढवला तर काँग्रेस पक्षाला मानणारा मतदार वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने नक्कीच फायदा होईल म्हणून संधी मिळाल्यास या मतदारसंघासाठी आपणही इच्छुक असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे कोकण विभागातील प्रत्येक जिल्हानिहाय आढावा बैठक मीरा भाईंदर याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष इर्शाद शेख यांद्वारे आढावा सादर करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यां सोबत राज्य प्रभारी रमेश चेंनिथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चर्चा केली. त्यावेळी श्री मोंडकर यांनी हे मत व्यक्त केले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रामुख्याने सावंतवाडी मतदारसंघ व संधी मिळाल्यास कणकवली मतदारसंघात पदाधिकारी निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने या मतदारसंघास लढण्यास इच्छुक असलेले पदाधिकारी देखील उपस्थित होते.
या वेळी जिल्हा प्रभारी प्रदेश सचिव अजिंक्य देसाई, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण टेबुलकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, संदेश कोयंडे, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, सुरज घाडी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.