२७ सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याच्या दौऱ्यावर
मुंबई :
राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या दौरा करणार आहे. येत्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी आयोगाचा मुंबई दौरा आयोजित करण्यात आलाय. निवडणुक आयोगाच्या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची माहिती आहे.
दौऱ्यामध्ये निवडणुक आयोग राज्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करतील. विधानसभेच्या निवडणुका घेण्याबाबत काय तयारी झालीय, कोणती तयारी बाकी आहे, याबाबतचा एकूण आढावा घेण्यात येईल. निवडणुक आयोगाच्या या दौऱ्यामुळं राज्यातील विधानसभा निवडणुका संदर्भातील घडामोडींना वेग आलाय. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोग २८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेणार आहे. सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यापूर्वी निवडणुक आयोगाकडुन प्रत्येक राज्याचा दौरा करण्यात येतो.
विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या तयारीला मोठा वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चां सुरू आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असावा यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू झालाय.
महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला होणार असे चित्र दिसत असले तरी राज्यात तिसरी आघाडी देखील स्थापन करण्यात आली आहे. राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, संभाजीराजे यासोबतच इतर काही नेत्यांनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंजक होईल यात शंका नाही. त्यातच वंचितने ११ उमेदवार जाहीर करून जय्यत तयारी सुरू केली.