You are currently viewing आयुष्याचं रिंगण

आयुष्याचं रिंगण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम लेख*

 

*आयुष्याचं रिंगण*

 

माणूस जन्माला आला की त्याचं अंतिम स्थळ आणि प्रस्थान दोन्हीही ठरलेले, जगण्याच्या रिंगणासहीत! जन्मं तरी त्याच्या हातात कुठे असतो? जन्माला आला की लगेच प्रवास सुरू एकाच परिघात! फिरायचा…काहींचा दुर्दैवाने लगेच संपतो. लवकरच संपवायचा होता प्रवास तर देवाने जन्माला तरी कशाला घातले असे वाटते!.काहींचा जीवन‌प्रवास प्रदीर्घ सुरू राहतो. नाही म्हणायची कुणाची सोय नाही.आई वडील ठरलेले त्याचबरोबर गणगोतही आपसूक ठरलेले.नाही म्हणायला मित्र निवडायचा अधिकार तुमचा. चांगलं वाईट याची जबाबदारी तुमची ! काही जणांना जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य मिळते.

प्रवास आला की खिडकी हवीच आणि तो बघायला डोळेही हवेतच. या दोन डोळ्यांतून जेवढे दिसते तीच त्यांची व्याप्ती. प्रवास आला की विविध टप्पे आले .जीवनाच्या प्रवासात सुखदुःखाची गावे लागतात. चढ उतार येतात. कधीतरी संंकटांची मालिकाच मागे लागते.. प्रवासात कधी रखरखीत वाळवंट लागते तर कधी सुखाची हिरवळ. सुखदुःखाच्या दऱ्या पार करत मजल दरमजल करत एकेक टप्पा गाठत प्रवास चालूच असतो. *एक धागा सुखाचा ,शंभर धागे दुःखाचे* हा जीवनाचा नियम किती सार्थ आहे हे पटत असतं.

या प्रवासात प्रत्येक प्रवाश्याची तऱ्हा निराळीच बरं का! काही जण जमीन जुमला पैसा अडका असे भौतिक सुख कवटाळून बसतात.हे सगळे मागेच ठेऊन उतरायचंय हे माहित असूनही हे ही माझे आणि ते ही माझे म्हणून अडचण करतात.तर काही सर्व दान करून एखाद्या फकिरासारखे जगतात.त्यांना कशाचंच काही नसते.

या प्रवासात असंख्य माणसं भेटतात . काही त्रास देणारी काही मदत करणारी ! काही कायम लक्षात राहणारी ! काहींशी घट्ट ऋणानुबंध जुळून येतात अन् काही नसती भेटली तर बरं झालं असतं असं वाटणारीही भेटतात. एकंदरीत प्रवास असा पुढे‌पुढे जात असतो. हळूहळू त्या प्रवासातून आजी आजोबा , आई वडील काका काकू, मामा मामी आत्या, मावशी एक एक करत पायउतार होतात.त्यांच्याऐवजी जावई, सून नातवंडे असे नवीन प्रवासी येतात. प्रवास जसा जसा पुढे जातो तसे आपणही आई बाबा, आजी आजोबा अशी नवीन ओळख मिरवत जातो.

रिंगण पूर्ण होत आलेले असते …एक दिवस पैलतीरावरून सावळ्याची‌ हाक ऐकू येऊ लागते. ती हाक स्तब्धपणे ऐकत असतो. समजत असते संध्याकाळ आता कलत चालली आहे.आपण काय केले आयुष्यात याचा विचार करायची वेळ आली आहे..ऊर फुटेस्तो कसे धावत सुटलो, केलेल्या चुकांचे ओझे वाटायला लागते..मोह सुटले‌ नाही याची सल जाणवायला लागते. आणि आता तोच आपल्याला तारून नेईल ही भावना प्रबळ होत जाते..सूर्य निमत चालला याची जाणीव प्रकर्षांने होऊन केलेल्या चुकांची टोचणीने वैफल्य येते. आयुष्याचं पासबुक डेबिट क्रेडिट सहित डोळ्यांना दिसत असतं. माघारी फिरायची वेळ आलेली असते हे समजून चुकते .ऐलतीरावरून पैलतीरावर नेण्यासाठी नावाडी सज्ज असतो….

आणि अचानक प्रवास संपतो. अंतिम स्थळ आलेले असते.सगळे कसे निपचित आणि शांत. कसलीच गडबड नाही, धडपड नाही. कसलीच घाई नसल्यासारखे. प्रवास सुरू झाला तेव्हा एकटेच आलो असतो आणि आताही एकटेच उरतो. कुठे जात आहोत कुठे उतरत आहोत काही समजत नाही.आवाज नाही उजेड नाही.फक्त शांतता आणि निर्वात पोकळी. नवीन देहरूपी कपडे चढवून माहित नाही या योनीतून दुसऱ्या कुठल्या तरी दुसऱ्या योनीत परत प्रवास सुरू व्हायचा असतो,..चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा प्रवास कधी संपायचा असतो ते त्या सावळ्यालाच माहीत……

 

*©️®️ डॉ.सौ.मानसी पाटील*

मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा