*पालकमंत्री रवींद्र चव्हाण वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते विशाल परब यांनी केला ‘रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्या’ चा संकल्प*
सावंतवाडी :
मला बोलायला आवडत नाही तर माझ्याकडून जे- जे होईल तेथे करून दाखवायला आवडतं. मी आरोग्याच्या अडचणीत अनेकांना मदत केली, आरोग्य केंद्राला अनेक गरजेच्या वस्तू प्रदान केल्या, अजूनही खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. त्यावरही मी आज बोलणार नाही. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण चव्हाण यांच्या वाढदिवसाला “रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्या”च्या संकल्पचा शुभारंभ करत आहोत.सावंतवाडीकर जनतेच्या हितासाठी असलेले सर्व संकल्प परिपूर्ण करण्यासाठी मी माझ्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे असं मत भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले,सावंतवाडी मतदार संघातील लोकांसाठी आरोग्याच्या सुविधांचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे हे अनेकदा जवळून अनुभवलं. त्यामुळे या विषयासाठी भविष्यात काय करायचे याच्या अनेक गोष्टी मनात निश्चित केल्या आहेत. माझ्या दोडामार्ग भेटीच्या वेळी एका वृद्ध काकांनी डोळ्यात पाणी आणून मला तो किस्सा सांगितला. एका अपघातात एका माणसाचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम नंतर त्याचा मृतदेह शिवण्यासाठी आरोग्य विभागाकडे साधा धागाही नव्हता. त्या माणसाची मुलगी मुंबईतून येईपर्यंत तो मृतदेह खळ्यात तसाच ठेवण्यात आला होता. तो प्रसंग कधीच डोळ्यासमोरून गेला नाही, ती मनाला आलेली अस्वस्थता आजही कायम असं मत विशाल परब यांनी व्यक्त केले.
तसेच लवकरच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद संघातील जनतेसाठी अपघात आणि उपचार यासाठी एक रुग्णवाहिका जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मी मानतो. माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी माझी जनसेवा सतत चालू राहील. विकासातले झपाटलेपण काय असू शकते, पालक कसा असावा हे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखवून दिले आहे. ज्या झाडाला फळे लागतात त्याच झाडांवर दगड बसतात, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु कोणाच्या टीकेची पर्वा करता “नेकी कर और दर्या मे डाल” अशा पद्धतीने विकासाकडे वाटचाल कशी करायची याचा मंत्र रवींद्र चव्हाण यांनी आपल्या वाटचालीतून दिला आहे. याच मंत्रजपातून माझी आजची समाजसेवेची साधना सुरू आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काम करत असताना मी लोकांचे अपार प्रेम अनुभवतो. त्यातून मिळणारे समाधान हीच या मंत्रजपाच्या साधनेतून मिळालेली फलश्रुती आहे, असे मी मानतो. मी हे कार्य कोणत्याही स्वार्थातून करत नाही. मी या मतदारसंघांचे कार्यक्षेत्र हे राजकारणासाठी नाही तर समाजसेवेसाठी निवडलेले आहे. इथल्या लोकांच्या डोळ्यात मला ते समाधान पहायचे आहे, जेव्हा त्यांची पुढची पिढी ही याच ठिकाणी चांगला रोजगार मिळवून आर्थिक श्रीमंती प्राप्त केलेली असेल. चांगल्या रोजगारामुळे आरोग्याचे प्रश्न हे त्यांच्या आर्थिक कवेत सहजपणे येतील. या पिढीचे संरक्षण कवच म्हणून या रुग्णवाहिका जनतेच्या सतत सेवेत राहतील. मी बोलणारा माणुस नाही तर करून दाखवणारा माणूस आहे. या मतदारसंघात आजवर अनेकांचे अनेक संकल्प घोषित झाले असतील. ते संकल्प म्हणजे मी त्या त्या ज्येष्ठ व्यक्तींच्या भावना मानतो, आणि ज्येष्ठांच्या भावनांची आणि संकल्पनांची परिपूर्ती करणे ही युवकांची जबाबदारी असते असं मत व्यक्त केले.
दरम्यान, सावंतवाडीकर जनतेच्या हितासाठी असलेले सर्व संकल्प परिपूर्ण करण्यासाठी मी माझ्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांना जनता जितके जास्त बळ देईल तितक्या वेगात या मतदारसंघातील सर्व युवकांना सोबत घेऊन मी ज्येष्ठांच्या संकल्पांची पूर्ती संकल्प निश्चितपणे करेन. सर्वच ज्येष्ठ मंडळी, महिला, युवा सर्वांचे आरोग्य अबाधित राहो, खणखणीत राहो अशी माझी नेहमीच भावना असेल, आणि त्या आरोग्याच्या मार्गात जे काही संकट येईल त्याचे प्रत्येकवेळी सुखरूप निरसन या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होवो अशी प्रार्थना त्यांनी विघ्नहर्ता गणेशाकडे केली. अशा समाजहिताच्या मार्गावर न डगमगता अविरतपणे चालण्याची प्रेरणा देणाऱ्या रवींद्र चव्हाण या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व परमेश्वर त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात भरभरून यश देवो आणि हा सिंधुदुर्ग पुन्हा नव्याने घडवण्यासाठी बळ देवो अशी प्रार्थना विशाल परब यांनी केली. यावेळी अँड. अनिल निरवडेकर, माजी सरपंच विनोद राऊळ, माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडीवरेकर, अक्रम खान, राजू बेग, दिलीप भालेकर , केतन आजगावकर आदी उपस्थित होते.