आपल्या परिसरात चालणाऱ्या मटका,जुगार,ड्रग्ज-गांजा विक्री,बेकायदेशीर दारू विक्री आदि अवैध व्यवसायाबाबत महाराष्ट्र सैनिकांना सविस्तर माहिती द्या..
मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचे जनतेला आवाहन
पणदूर :
जिल्ह्यात सर्वत्र जुगार,मटका,गांजा व ड्रग्ज विक्री आणि गावठीसह गोवा बनावटीची दारू विक्री आदि अवैध व्यवसाय कोरोना संचारबंदी कालावधीपासून फोफावू लागत असल्याने जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढू लागल्याचे चित्र आहे. अशा अनैतिक व्यवसायांवर पोलीस कर्मचारी नियंत्रण आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात मात्र अपुऱ्या कर्मचारी बळामुळे या अवैध व्यवसायांचे मुळासकट उच्चाटन होण्यास मर्यादा येत आहे.शिवाय काही भ्रष्ट कर्मचारी अशा व्यावसायिकांना अर्थपूर्ण संबंधांतून पाठीशी घालत असल्याने त्यांची दहशत निर्माण होवून काही ठिकाणी माफियाराज बोकाळल्याची परिस्थिती निर्माण झालेली पहावयास मिळते. आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन अक्षरशः बरबाद होत आहे अशा असंख्य पालकांच्याच तक्रारी मनसेकडे प्राप्त होवू लागल्या आहेत.लोक लज्जेस्तव आपण बोलू शकत नसल्याची भावना व्यथित होत पालक बोलून दाखवत आहेत.
मनसे याबाबत तीव्र आक्रमक असून अवैध व्यवसायांच्या विरोधात मैदानात उतरली असून पोलीसांना या मोहिमेत सहकार्य म्हणून बेकायदा व्यवसायांची ठिकाणे, व्यावसायिक आदींबाबत माहिती पुरवून कठोर कारवाईसाठी आग्रही राहणार असून प्रसंगी रस्त्यावर उतरणार आहे. देशाची भावी पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन निष्क्रिय बनू नये. यासाठी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक कार्यतत्पर आहेत. या समूह उच्चाटनाच्या लढाईत जनतेने देखील सामील होवून आपल्या परिसरात बेकायदा दारु विक्री, जुगार, मटका,गांजा व ड्रग्ज विक्री आदि अवैध व्यवसाय होत असल्यास महाराष्ट्र सैनिकांशी संपर्क साधून सविस्तर माहिती कळवावी असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व विद्यार्थी सेना जिहाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले असून अशा बेकायदा व्यवसायांची माहिती देणाऱ्या सुजाण नागरिकांची नावं गुपित ठेवण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.