गणेश मंडळ द्वारे आयोजित काव्य मैफिलीला भक्त भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद..
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी)-
समाजातील वास्तव, विदारक परिस्थिती मांडताना सध्याची परिस्थिती, सामाजिक समस्या, शेतकर्याची अवस्था तसेच तरुणांना, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मनात रुजवण्यासाठी कविता एक प्रमुख सामाजिक प्रबोधनाचे माध्यम आहे. ही संकल्पना छत्रपती संभाजीनगर येथील साहित्यिक कवी, कवयित्री सौ. सुनिताताई गोविंद कपाळे, डॉ सुशिल सातपुते, श्री विजयकुमार रामराव पांचाळ, श्री रोहीदास शिखरे, श्री दिपक नागरे, श्री संदेश वाघमारे यांनी आपल्या बहारदार कवितेतून सिद्ध केली.
छत्रपती संभाजीनगर येथील गणपती महोत्सवात श्रीराम नगर,नक्षत्रवाडी येथील श्री राम गणेश मंडळ तसेच शिक्षक काॅलनी सुंदरनगर, चिकलठाणा येथील सिद्धिविनायक गणेश मंडळ व
माऊली नगर , देवळाई , बीड बाय पास येथील श्री माऊली गणेश मंडळ यांनी एक समाजात मानवता धर्म रुजवण्यासाठी तसेच महापुरुष, संत , आई, वडील, शिक्षक यांचे विचार आचरणात आणण्यासाठी खऱ्या प्रबोधनाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर मधील साहित्यिकांना कविता सादरीकरणासाठी निमंत्रित करुन भव्य काव्यमैफिलीचा सोहळा आयोजित केला होता.
या काव्य मैफिलीत सामाजिक बांधिलकी, महापुरुषांचे विचार, स्त्रियांचे प्रश्न, आई, बहीण, लेक, बाप, शेतकर्याची अवस्था, या जिव्हाळ्याच्या नात्यांची महती सांगणारे काव्य सादरीकरण झाले. रसिक मंत्रमुग्ध होत उस्फूर्त प्रतिसाद दिला. बाप, लेक, बहीण, आई या कविता खूप हृदयस्पर्शी झाल्या. डोळ्यातील आलेले अश्रू पुसत आम्ही आमच्या नात्याला जपणार या भावना भक्त भाविक, रसिकांनी व्यक्त केल्या. तसेच सामाजिक कवितेने तरुण पिढीला सध्याचे वास्तव मांडत योग्य दिशा देण्याचे कार्य केले.
बाप कवितेत सौ सुनिताताई कपाळे यांनी
भिरभिरतं पाखरू
पुन्हा माहेरच्या वाटे,
नाही दिसत सावली
अश्रू डोळ्यातही दाटे..
गणपती बाप्पा वर आधारित बाप्पा कवितेतून डॉ.सुशिल सातपुते यांनी
बरं झालं बाप्पा
तू पक्षात नाहीस
पक्षाचं चिन्ह म्हणून
कोणाच्या लक्षात नाहीस
ही विनोदी रचना सादर करत, रक्तदान पटत नाही ही मानवता पत्रकार धर्म सांगणारी त्याचप्रमाणे चित्रपट, परिषदा, चर्चा ही सध्याची राजकीय परिस्थिती सांगणारी रचना सादर करून मैफिलीत रसिकांची दाद मिळविली.
श्री विजयकुमार पांचाळ यांनी भक्षक या कवितेतून वास्तव परिस्थिती मांडत मणिपूर, बदलापूर तसेच देशातील असंख्य होणाऱ्या अन्यायकारक घटनांचा उल्लेख करत सामाजिक परिस्थिती विषयी खंत व्यक्त केली. त्याचप्रमाणे ‘माझ पिल्लू’ ही बाप, मुलगी प्रेम या नात्यामधील सध्याची वास्तव परिस्थिती मांडली. भक्षक कवितेतून व्यक्त होताना,
निच्चांक पशुवृत्तीचा
मुलींच्या भावना समजत नाही
भारत मातेचा पदर ही
भक्षकांना आईचा वाटत नाही
श्री रोहीदास शिखरे यांनी “लेक” या कवितेतून आई-बापाची तळमळ आणि विरह याचा दुहेरी संगम आपल्या कवितेतून सादर केला. अक्षरशः रसिक श्रोत्यांचे डोळे पाणावलेले दिसले अशी हृदयस्पर्शी रचना सादर करताना,
लेकी दोन दिवस येऊन जा
माहेराला राहून जा
निमित्त आहे सणाचं
गोडधोड खाऊन जा
तसेच माणसाला माणसाशी जोडणाऱ्या आणि वास्तववादी “माणूस जिवंत ठेवा!” “मला जगायची वाटते भीती” रचना सादर केल्या.
माणसाच्या मन मंदिरात
माणूस जिवंत ठेवा
माणसातील तोच माणूस
ईश्वराचा रे ठेवा
श्री दिपक नागरे यांनी,
सुख सांडलं शेतात
भरायास ताट नाही
काळा अंधार घरात
उजेडास वाट नाही
या कवितेतून शेतकरी बापाच्या जीवनातील व्यथा मांडल्या, तसेच शेतकरी, बहीण या विषयावर भावस्पर्शी रचना सादर केल्या त्यासोबत मला बायको द्या ही विनोदी रचना सादर करत तसेच प्रेम दीवाना ह्या रचनेने तरुणांची मने जिंकली.
श्री संदेश वाघमारे यांनी ‘बापाचा माझ्या मित्र कधी मला होता आले नाही’ या कवितेतून बाप मांडला,
बापाचा माझ्या मित्र
कधी मला होता आले नाही
त्याच्या स्वप्नातील चित्र
कधी मला रेखाटता आले नाही.
तसेच कवितेतून शेतकरी आत्महत्या, लाडकी बहीण या विषयांवर वास्तव मांडले.
कवितेतून होणारे सामाजिक प्रबोधन आणि शाळा, कॉलेज,गावे,शहर प्रत्येक ठिकाणी या साहित्यिक समुहाला मिळणारा प्रंचड प्रतिसाद यामुळे सगळ्या गणपती मंडळांने या संपूर्ण टिमला निमंत्रित केले होते. रितसर बाप्पाची आरती केल्यानंतर परिसरातील सर्व भक्त, रसिक, गावकरी या काव्य मैफिलीचा आनंद घेतला. स्त्रिया, पुरुष विद्यार्थी मंडळाचे पदाधिकारी यांनी या काव्य मैफिलीचे मनापासून स्वागत करत , कवि कवयित्री यांचा सन्मान करत उत्साहाने दाद दिली. छत्रपती संभाजीनगर तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यासाठी वाढता प्रतिसाद बघता भविष्यातील गणपती मंडळ, नवरात्र महोत्सव, शाळेतील सांस्कृतिक महोत्सव प्रत्येक ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी काव्य मैफिल आयोजित केली जात आहे. रसिकांना मंत्रमुग्ध करणार्या या काव्य मैफिलीचे बहारदार सूत्रसंचालन कवी, लेखक प्रा.डॉ. सुशिल सातपुते यांनी केले आहे. सूत्र संचालन करत असताना विनोदी किस्से, वातावरण प्रसन्न, ठेवले त्याचबरोबर सामाजिक संदेश ही दिला.
आपण समाजाचे काही देणे लागतो त्यामुळे आमच्या स्वरचित कवितेतून आम्हाला हे भाग्य मिळाले व पुढेही निरंतर मिळत राहील यापेक्षा आमच्या जीवनात कोणतीच गोष्ट महत्वाची नाही. कारण नि:स्वार्थीपणे महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवणे खूप महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे असे मत कवयित्री सौ सुनिता गोविंद कपाळे, कवी सुशील सातपुते,कवी श्री विजयकुमार रामराव पांचाळ, कवी श्री रोहीदास शिखरे, कवी श्री दिपक नागरे, कवी श्री संदेश वाघमारे या काव्य मैफिलीच्या समुहाने व्यक्त केले आहे.