You are currently viewing अत्त दीप भव

अत्त दीप भव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम चित्र ललीत*

 

*अत्त दीप भव*

 

*अत्त दीप भव….*तूच म्हणालास ना.सर्व जगाला शांतीचा ,अहिंसेचा संदेश दिलास…..तुझी तेजस्वी पण मंद ज्योतीसम उजळलेली ही प्रतिमा काय बरं सांगतेय?

शांतता हेच जीवनाचं सारसर्वस्व आहे….‌तुझी शांत करुणामयी प्रतिमा मनाला किती धीर देऊन जाते…जणू सोशिकता, सहनशीलता,मौन हीच समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे..‌

भोवताली काळोख ,अज्ञानाचा तिमिर दाटलेला..पण तुझी स्वस्थ,

स्मितमुद्रा चिरशांती दर्शवते.अर्धोन्मिलित मल नेत्र कारण्याने ओतप्रोत भरलेले….

आणि ती चाफेकळी बोटं..ओठांवर

टेकून मौन दर्शवतात.

जगातील सर्वात जास्त भांडणं केवळ बोलण्यातून उद्भवतात‌.घनघोर युद्ध ही होतात त्यातून….तू किती द्रष्टा आहेस..मौन राहूनच मौन दर्शवतोस.बोलणंच टाळा,म्हणजे स्तुती टळेल तसेच वैरही टळेल. मौनं सर्वार्थ साधनम…पुढील शब्दच्छलच नको ,मौनाइतकं दुसरं सुंदर काहीही नाही.मौन आत्मचिंतन,मौन आत्म्याचा आवाज ऐकणं,मौन स्वतः तील चुका शोधणं,मौन सगळ्यांना ते मनातून क्षमा करणं..‌तुझ्या एका कृतीतून तू केवढं तत्वज्ञान सामान्य जनांपर्यंत पोचवलंस.म्हणूनच तू बोधीसत्व आहेस बुध्द आहेस…

तुला बघताच मनातील विकार नष्ट होतात.सुविचारांची ज्योत उजळते.

स्वच्छ नितळ प्रकाश फक्त सर्वत्र,ज्ञानाचा,तेजाचा, शांत मूर्ती चा!

जगाच्या कल्याणासाठी संसारत्याग करून माणसातील माणूसपण जागं केलंस‌.व्रतस्थ राहून संन्यास धर्म हा आचरला.

तुझा धीरगंभीर पण शांत व सौम्य चेहरा मनाला नित्य सन्मार्गावर ठेवेल..‌‌त्याग व करुणेचं मूर्ती मंत प्रतीकच तू..

आपणच आपले पथदर्शी व्हा हे मूक पण बोलक्या चित्रातून तू किती सुंदर पटवलेस.‌‌..धन्य शिल्पकाराची…..!

मूर्ती, चित्र सगळ्यातून केवळ आस्था आणि करूणेचं दान देणार्या ..तुला शतशत नमन!

०००००००००००००००००००

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा