भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान कुडाळ येथे कॅरमची वरिष्ठ राज्य मानांकन “पालकमंत्री चषक स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह सरचिटणीस रणजित देसाई, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, क्रीडा प्रकोष्ठ जिल्हा संयोजक योगेश फणसळकर, कॅरम असोसिएशनचे सुनील धुरी, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, श्रीपाद तवटे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, देवेंद्र सामंत, राजा धुरी, भाई बेळणेकर, संयोजक विश्वास पांगुळ, माजी सभापती मोहन सावंत आदी उपस्थित होते. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मान्यतेने सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या संयुक्त विद्यामानाने वरिष्ठ राज्य मानांकन कॅरम “पालकमंत्री चषक स्पर्धा” कुडाळच्या महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये राज्यभरातून सुमारे २५० ते ३०० स्पर्धक सहभागी होतील तीन विश्वविजेते २७ आंतरराष्ट्रीय खेळाडू १४ राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सध्याचा विश्वविजेता मुंबई उपनगरचा संदीप दिवे, त्या आधीचा विश्वविजेता आणि विश्वचषक विजेता रिझर्व बँकेचा मुंबईचा प्रशांत मोरे व पुणे येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा दोन विश्वविजेतेपद विश्वचषकासह ५८ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता योगेश परदेशी हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असतील. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन ही देशात नव्हे तर संपूर्ण जगात अग्रेसर कॅरम संघटना आहे. सोशल मीडियावर ३ लाख फॉलोवर्स आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेतील सुमारे ५० सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगभरातले कॅरम रसिक पाहू शकणार आहेत.
ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन मान्यताप्राप्त सुरको किंग या २४ कॅरम बोर्डवर खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी कोल्हापूर येथील बीएसएनएलचे सूर्यकांत पाटील व कुडाळ येथील मधुकर पेडणेकर हे दोन राष्ट्रीय कॅरम पंच प्रमुख पंच म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय कॅरम पंच अजित सावंत हे तांत्रिक अधिकारी तर शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू अरुण केदारे हे स्पर्धा निरीक्षक अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहे.
भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ जिल्ह्यात गठित झाल्यानंतरचा हा पहिलाच मोठा उपक्रम संपन्न होत आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण स्वतः कॅरम प्रेमी आहेत. त्यांनी ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष पद भूषविले आहे. ‘पालकमंत्री चषक’ या नावामागे संकल्पना अशी आहे की, दरवर्षी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने व उपस्थितीत ही कॅरमची राज्यस्तरीय स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेळविली जाईल. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा कॅरम असोसिएशन मार्फत आपली नावे घेण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२४ ही आहे. या आधी ऑगस्ट महिन्यात आपल्या जिल्ह्यातील २ गुणवंत कॅरम पटू मुलींनी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विजयपट पटकावले ही बातमी पालकमंत्र्यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये त्यांचं कौतुक करून त्यांना नवे कोरे कॅरम बोर्ड घेऊन प्रोत्साहित केले होते.
या स्पर्धेच्या घोषणेनंतर खासदार नारायण राणे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत व स्पर्धेच्या उद्घाटन पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक कॅरम असोसिएशने ४ राज्य स्पर्धा व वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेचे यजमानपद यशस्वीपणे भूषविले आहे. सावंतवाडी येथील २०१९ च्या वरिष्ठ राज्य कॅरम मानांकन स्पर्धेनंतर ५ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राज्यस्तरीय स्पर्धा पुन्हा एकदा सिंधुदुर्ग मध्ये होत असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.