You are currently viewing भोपळा फुले

भोपळा फुले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भोपळा फुले*

———————–

 

फुटकी कौले, तुटके छप्पर, गरीब दिसते ते घर

छपरावरच्या सोन फुलांनी खुशीत झुलते ते घर

 

कौलांवरती हिरव्या वेली चढून गेल्या साऱ्या

पिऊन अमृत फुलास येता मजेत हसते ते घर

 

सोन्यावाणी लखलख करती धम्मक पिवळी सुमने

झुळूक वारा येता जाता खुशीत फुलते ते घर

 

पाचू,मोती पहाट वेळी फुलाफुलांवर पडती

उजाडताना दंवात न्हाले चमचम करते ते घर

 

घसघशीत त्या सोनफुलांनी छप्पर सारे सजले

निसर्गशोभा माथी लेउन सवेच खुलते ते घर

 

किती सजवली शहरा मधली निवासस्थाने भारी

झगमगणारे नकोत इमले, मनास भुलते ते घर

 

सौंदर्याने नटलेले ते, जरी मोडके दिसते

काळ लोटला तरी निरंतर मनात वसते ते घर

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा