You are currently viewing वनहरिणीची अडचण

वनहरिणीची अडचण

*गझल मंच गझल मंथन समूहाच्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे यांनी गझलकार सिराज शिकलगार यांच्या “वनहरिणीची अडचण” गजलेचे केलेले रसग्रहण*

 

*वनहरिणीची अडचण*

*गझल रसग्रहण*

 

गझलकार सिराज शिकलगार हे सांगली जिल्ह्यातील आंधळी या खेड्यात राहणारे एक उत्तम गझलकार आहेत. आज पर्यंत त्यांचे मराठी गझल साहित्यात गझलेचेच सतरा संग्रह व ‘दीवान-ए -सिराज’ मिळून एकूण अठरा गझल संग्रह प्रकाशित झालेले आहेत. तसे बाकीचे काव्यसंग्रह व इतर मिळून त्यांची आजपर्यंत 31 पुस्तके प्रकाशित झाली आहेत व अजून सहा गझल संग्रह व इतर एक पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. ते लवकरच प्रकाशित होणार आहेत. त्यांचे चाहते व वाचक त्यांना शीघ्र- गझलकार असे म्हणूनही संबोधतात.

गझल क्षेत्रात दीवानमध्ये पाचवा क्रमांकाचा ‘दीवान -ए -सिराज’ लिहिणारे आदरणीय श्री सिराज शिकलगार ह्यांची वनहरिणी मात्रावृत्तामधील एक गझल मला फार आवडली. ‘वनहरिणीची अडचण’ या शीर्षकाच्या गझलेचे मी रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे, ती गझल आधी पाहू —

 

*वनहरिणीची अडचण*

 

जवाएवढे दु:ख दर्शनी मला मांडणे जमले नाही

गरजेसाठी उधार-उसने मला मागणे जमले नाही

 

चुका-तारका मोजत बसलो साक्ष नभाची काढत बसलो

तोंड फिरवुनी झोपी गेली तिला जागणे जमले नाही

 

व्यथा-वंचना खर्‍या मानल्या जमेल तितके सहाय्य केले

कुणा मनीचा लबाड-खोटा भाव जाणणे जमले नाही

 

स्वार्थापायी रुसून बसली काही नाती निघून गेली

फिरून आली माघारी तर मला टाळणे जमले नाही

 

सदैव केला पाठलाग पण हमरस्त्याने मी ध्येयाचा

दिसेल तिकडे दहा दिशांनी मला धावणे जमले नाही

 

स्वतंत्र-साधी शैली माझी वाचक माझे पाठीराखे

कळपामध्ये लाचारीने मला वागणे जमले नाही

 

माय मराठीचा मी सेवक तंत्रशुद्धता अंगिकारली

अनुवादाच्या उष्ट्यावरती मला गाजणे जमले नाही

 

सिराज शिकलगार

9890597855

 

*रसग्रहण :—-*

 

मा.सिराज शिकलगार सरांच्या गझलेचा मतलाच बघा. साध्या सरळ मार्गावरून चालणारा  माणूस आहे. जे स्वतःजवळ आहे  त्यातच निभावणारा, दिखावा बहाणा न करणारा साधा माणूस त्यांनी मतल्यात वर्णिला आहे ते पहा:-

 

*जवाएवढे दु:ख दर्शनी मला मांडणे जमले नाही*

*गरजेसाठी उधार-उसने मला मागणे जमले नाही*

 

गझलकाराची वृत्ती लाजाळू साधी सरळ आहे. स्वतःचे दुःख दुसऱ्याला सांगून दुसऱ्याकडून सहानभूती मिळवणे त्यांना कधीच जमले नाही. दुःखाचा सामना ते स्वतःच आत्मनिर्भयपणे करत असतात. आजच्या जगात जराशा दुःखाचा बाऊ करून दुःखाचाच बाजार मांडण्याची प्रवृत्ती बऱ्याच लोकांमध्ये आढळून येते, पण गझलकार तशा प्रवृत्तीचे मुळीच नाहीत. तसेच संसार म्हटला की, अडी अडचणी येतच असतात अशावेळी दुसऱ्याकडून, किंवा शेजार-पाजाऱ्यांकडून उधार उसनवारी करणे त्यांना कधी जमले नाही. दुसऱ्याकडन उधार उसने घेऊन त्यांना आपला व्यवहार चालवणे जमले नाही. मामुली वस्तूची निकड दुसऱ्याकडून मागून घेणे व आपला परमार्थ साधणे त्यांना लज्जास्पद वाटत असल्याने  ते त्या भानगडीत कधी पडले नाहीत. आपली कमतरता दुसऱ्याकडून घेऊन भागवणे त्यांना पंसतच नव्हते हे त्यांच्या मतल्यावरूनच स्पष्ट होत आहे.

आता सरांचा दुसरा शेर बघुया :-

 

*चुका-तारका मोजत बसलो साक्ष नभाची काढत बसलो*

*तोंड फिरवुनी झोपी गेली तिला जागणे जमले नाही*

 

संसार म्हटला की नवरा -बायकोमध्ये वाद -विवाद, भाडंण-तंटे होतच असतात आणि गोडी गुलाबीने ती लगेच मिटलेही जातात. अशाच प्रसंगी राग रुसवा करून गझलकार रात्रीच्यावेळी मोकळ्या अंगणात चिंताचूर होऊन नभाकडे दृष्टी लावून पहुडले असतील. माझं काय चुकलं? संसाराच्या वाद विवादात कोण बरोबर कोण चूक  हे ठरवणार कोण? मला साक्ष कोण देणार? असे विचार येताच आकाशातल्या तारका व आपल्या चुका मोजत त्यांच्याशी हितगुज साधून नभाचीच साक्ष घेत बसतात. रात्र बरीच झाल्याने आत येऊन झोपायला जातात तर वादात रागावलेली बायको पाठ फिरवून झोपी गेली आहे.

दिवसा झालेल्या वादावादीची खंत तिने मनाला लावून घेतलीच नव्हती. त्यामुळे ती शांत झोपून गेली होती. इथे गझलकाराला सांगायचे आहे की बायकांचे रुसणे वरवरचेच असते त्यांचा राग ही लटकाच असतो. पुरुषांसारखे स्त्रिया नवऱ्याचा राग मनावर घेत नसतात. गझलकार मात्र खूपच चिंतेत असल्यांने त्याची झोप उडाली होती. त्यामुळे तिला जागणे जमले नसेल किंवा जागून विचार करण्याची गरज ही भासली नसेल. म्हणजेच वाद मिटवण्याची इच्छा फक्त पतीलाच जास्त असते ‘ हे गझलकारला दाखवून द्यायचे असावे.

आता तिसरा शेरांत सरांना काय सांगायचे ते पाहू —

 

*व्यथा-वंचना खर्‍या मानल्या जमेल तितके सहाय्य केले*

*कुणा मनीचा लबाड-खोटा भाव जाणणे जमले नाही*

 

आजचे जग हे स्वार्थी माणसांनी भरलेले असले तरी गझलकारा सारखे काही साधी माणसेही आहेत. अशा साध्या माणसाकडे कुणी आपली व्यथा- विवंचना समोर मांडली तर गझलकारास ती खरीच वाटून ते सरळ,सढळ हातांनी स्वतःला जमेल तशी त्या माणसास वेगवेगळ्या स्वरूपात मदत करायला तत्पर असतात. समोरचा माणूस त्यांना फसवून लुबाडत असल्याची शंका सुद्धा त्यांच्या मनात येत नाही. जशी वृत्ती तशी दृष्टी असे मला म्हणावे वाटते . खरी म्हण “जशी दृष्टी तशी सृष्टी”  गझलकारास स्वतःसारखीच समोरची व्यथा -वंचना कथित करणारी माणसे प्रामाणिक वाटतात. त्या माणसांत लबाडपणा, त्यांच्या बोलण्यात खोटेपणा वगैरे असेल का हे जाणून घेणे ही त्यांना कधी जमले नाही.

सरांचा आता चौथा शेर काय म्हणतो पाहू -++

 

*स्वार्थापायी रुसून बसली काही नाती निघून गेली*

*फिरून आली माघारी तर मला टाळणे जमले नाही*

 

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. नाते बंध छान जोपासले जायचे. विभक्त कुटुंब पद्धत सुरू झाली ती प्रत्येकाच्या स्वार्था पाईच. शिक्षण ,नोकरी धंदा समजू शकतो पण नात्यात ओल होती. आज छोट्या कुटुंबात ही तशी स्थिती पाहायला मिळते. तरूण तरूणी आपसात लग्न जमवतात घरच्यांचा विरोध असतो. स्वार्थासाठी हे तरूण घरदार सोडून जातात तर काही ठिकाणी रुसवा एवढा धरतात की एकमेकांचे तोंडसुद्धा पाहत नसतात. अशी दुरावलेली, रुसलेली नाती काही काळाने पुन्हा जुळवून घ्यायला येतात. अशावेळी सगळेच ती नाती जुळवून घेत असतात असे मुळीच नसते पण गझलकार मात्र ह्याला अपवाद आहे. रुसलेली, दुरावलेली नाती पुन्हा आली तर ते मोठ्या मनाने परत घेतात. त्या लोकांशी कठोर व ताठपणा दाखवणे त्यांना जमत नाही. परत आश्रयाला आली तर ते त्यांना टाळू शकत नाही असे अतिशय प्रेमळ प्रवृत्तीचे गझलकार आहेत असे मला वाटते.

पांचव्या शेरात गझलकार काय म्हणतात पाहू —

 

*सदैव केला पाठलाग पण हमरस्त्याने मी ध्येयाचा*

*दिसेल तिकडे दहा दिशांनी मला धावणे जमले नाही*

 

प्रत्येक माणसाचे एक स्वप्न असते. ते स्वप्न ध्येय पूर्ण करण्यास  माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो व तो जातोच. कोणत्याही परिस्थितीतून ध्येय गाठायचेच असा त्यांचा निर्धार असतो, त्याकरता वाट्टेल त्या आडमार्गाने ते जाऊ शकतात पण गझलकार  मात्र खूपच वेगळा आहे. त्यालाही ध्येय गाठायचे आहेच पण आडव्या वाकड्या मार्गाने नाही .दुसऱ्याला फसवून, लाच- लुचपत देऊन नव्हे तर सरळ प्रामाणिक मार्गाने जाऊनच ते तो मिळवायचा प्रयत्न करतो. दहा-दिशांनी जाऊन आटापिटा करून दुसऱ्यांना फसवून, ध्येय साध्य गझलकाराला कधी जमलेच नाही.

सहावा शेर पाहू:-

 

*स्वतंत्र-साधी शैली माझी वाचक माझे पाठीराखे*

*कळपामध्ये लाचारीने मला वागणे जमले नाही*

 

हा शेर मला खूप आवडला. आज साहित्य क्षेत्रात बराच गोंधळ चाललेला असतो. एकमेकांचे साहित्य चोरून आपल्या नावावर छापणे. स्पर्धेत नंबर मिळवण्याकरता परिक्षकाला मस्का मारणे. पुरस्कार प्राप्त करून घेण्यासाठी पैसे देणे असे बरेच प्रकार  होत आहेत. पण आपले गझलकार हे स्वतःच्याच साध्या शैलीत लिहिणारे आहेत.व त्यांचे लेखन वाचणारे वाचकही त्यांचे पाठीराखे आहेत. आपले कार्य साध्य करून घेण्यासाठी  दुसऱ्यांची हांजी हांजी करणे लाचारीने वागणे जे समुहात सरसकट सगळेच करत असतात पण गझलकार लेखणीचे पावित्र्य जपू पाहतो. स्वतःचा नीतीधर्म सोडून मिंधेपणाने कळपात वागणे त्यांना जमतच नाही.

आता सरांच्या गझलेतला शेवटचा शेर अतिशय सुंदर व अभिमानास्पद आहे व सर्वांनी बोध घ्यावा असाच आहे पहा

 

*माय मराठीचा मी सेवक तंत्रशुद्धता अंगिकारली*

*अनुवादाच्या उष्ट्यावरती मला गाजणे जमले नाही*

 

ह्या शेवटच्या शेरात सरांनी मराठी भाषेला माय मराठी म्हणून संबोधले ह्यातच  समजून येते की मराठी प्रमाणित भाषा व तिची तंत्रशुद्धता जपणारा हा अवलिया आपल्या लेखन शैलीला किती उच्च दर्जा देत आहे. कुठलीही भाषा असली तरी ती शुद्धच लिहावी असा संकेत आहे. आज आपण बघतो  मराठी म्हणून वाचत असतांना त्या लेखनात अनेक भाषांचा घोळ भरलेला असतो. धड मराठी नाही, इंग्रजी नाही अथवा हिन्दी नाही. मिश्र भाषित लेख वाचायला त्रासदायकच त्याच बरोबर लिहिणारा त्या त्या भाषेचा अपमानच करत असावा असे मला वाटते. अशिक्षीत लोकांचे आपण एकवेळा समजून घेऊ पण सर्व भाषा ज्ञानीनी आपले प्रभुत्व एकातच दाखवणे किती अयोग्य वाटते! शिवाय अशुद्ध लेखन ( सूट घेतलेले) व व्याकरणाचे नियम धाब्यावर बसवून लिहणारे व त्याचे समर्थन करणारेही काही महाभाग आज गझल क्षेत्रात पहावयास मिळतात. ह्या शेवटच्या शेरात गझलकाराला स्वतःचाच अभिमान आहे.

उलात ते सांगतात की मी माय मराठीचा सेवक असून मराठी भाषेचे तंत्रशुद्धता त्यांनी आपल्या लेखनात स्वीकारली आहे. तसेच सानीत ते म्हणतात की, ते कुणाचे अनुवादावरचे भाष्य करत नाही. अनुवाद लेखनात दुसऱ्यांच्या वैचारिक दृष्टीकोनातून आपल्याला जावे लागते. म्हणजे उष्टेच झाले. स्वतःचे असले की ते आपले स्वतःची शैली, खयाल ,नि दृष्टीकोन त्यावर गाजणे हे खरोखरच अभिमानास्पद असे मला वाटते.

सरांनी वनहरिणी मात्रा वृत्ततल्या गझलेत–+

*जमले नाही*…हा रदीफ घेतला असून

*मांडणे, मागणे, जागणे,जाणणे,टाळणे,धावणे, वागणे आणि गाजणे*..असे कवाफी घेतले आहेत. मला तर ही गझल फारच आवडली. तशी ती सर्वांनाच आवडेल यात शंका नाही.

 

धन्यवाद🙏🌹

 

शोभा वागळे

मुंबई.

8859466717

प्रतिक्रिया व्यक्त करा