‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फतच सादर करावेत
सिंधुदुर्गनगरी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फतच सादर करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात विशिष्ट कालावधीत बहुसंख्य अर्ज दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत यापूर्वी अर्ज नारीशक्ती दूत अॅप अथवा लाडकी बहीण योजना पोर्टल द्वारे कोणतीही इच्छुक महिला वैयक्तिकरित्या अथवा कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईल वरून देखील अर्ज सादर करू शकत होती.
तसेच बालवाडी, अंगणवाडी सेविका, समूह संघटक CRP मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्वीकारण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले होते. परंतु अशा प्रकारे अर्ज सादर करते वेळी चुकीचे कागदपत्रे जोडणे, आवश्यक कागदपत्रे न जोडणे, दुसऱ्याच व्यक्तीचे बँक खाते तपशील अथवा आधारकार्ड जोडणे या सारख्या चुकांमुळे अर्जदार महिलांच्या अर्जात त्रुटी निघत असून त्यामुळे बहुतांशी अर्ज तात्पुरते अपात्र करून त्रुटीपूर्तता करून घ्यावी लागत आहे. परिणामी पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यास विलंब होत आहे.
दि.2 सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेंतर्गत माहे सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत अर्जाची संख्या मर्यादित झाली असल्याने अचूक अर्ज भरून घेणे व जास्तीत जास्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी उपाययोजना करण्याबाबत शासन स्तरावर बाब विचाराधीन होती.
त्यानुसार दि.6 सप्टेंबर रोजी निर्गमित सुधारीत शासन निर्णयात नमूद तरतुदीनुसार, अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तीना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले असून दि.6 सप्टेंबर पासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तरी पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणेच्या अनुषंगाने यापुढे या योजनेंतर्गत अर्ज सादर करण्यास इच्छुक असणाऱ्या महिलांनी नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज सादर करावा. तसेच संबंधीत अंगणवाडो सेविका यांनी अचूक आवश्यक कागदपत्रे जोडून सदरील अर्ज ऑनलाईन स्वरुपात भरावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.