जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची उपस्थिती…
कणकवली
कोरोना लसीकरण रंगीत तालीम (ड्रायरन) शुभारंभ आज येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी याप्रसंगी भेट देत एकूण तयारीचा आढावा घेतला. तसेच नाव नोंदणी पासून लसीकरणानंतरपर्यंतच्या तयारीची पाहणी केली. तसेच काही सूचनाही केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, तहसीलदार आर. जे.पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ, डॉ. श्रीराम चौगुले, डॉ. सतीश टाक, डॉ. सी. एम. शिकलगार यांच्यासहित विविध विभागाचे खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
लसीकरणाच्या या ड्रायरन मध्ये आज आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २५ जणांची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यानंतर पुढील टप्प्यात प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल. त्यात आरोग्य, शासकीय महसूल, जिल्हा परिषद कर्मचारी, नंतरच्या टप्प्यात ५० ते ६० वर्षावरील नागरिक व त्यानंतर सर्वसामान्यांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाबाबत काही शंका असल्यास टोल फ्री १०७७ व जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागातील फोन नंबर यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.