*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम द्विपदी काव्यरचना*
*गौराई आली घरा*
वर्ण संख्या १२ यती ६व्या मात्रेवर
भाद्रपद मास अतिथी गं घरा
ज्येष्ठा नी कनिष्ठा हर्ष घरादारा…..१
सडा संमार्जन रांगोळी दारात
गौरीआगमन सारे आनंदात …..२
.
माहेरवाशीण उभी आता दारी
दूध पाणी घाला तिच्या पायावरी…..३
सोन्याच्या पाऊली गौरी आली घरी
रूप्याच्या पाऊली चैतन्याने भरी…..४
फुलांची आरास मखर सजले
तिच्या स्वागतास हार नाना फुले…..५
रुप्याच्या पाऊली घरात फिरली
पाहुनी सुबत्ता मखरी बैसली…..६
साडी जरतारी गळा मोती हार
प्रसन्न दिसते सुवर्णालंकार …..७
भाजी भाकरीचा नैवेद्य दाविला
आगमन शीण असा घालविला…..८
या गं या सख्यांनो ओटी तिची भरा
ज्येष्ठा नी कनिष्ठा आल्यात माहेरा…..९
षोडशोपचारे करूया पूजन
आज खास असे नैवेद्या बोडण ….१०
महानैवेद्याने सजले ते ताट
काय वर्णू तिचा किती थाटमाट….११
पुरणाचे दिवे आरती तालात
गाती आनंदात स्तुती ती सुरात…..१२
तीन दिवसांची निघते पाहुणी
होते जड मन डोळा येई पाणी ..१३
एकच मागणे कृपा छत्र धरी
आशिषाचा हात ठेव सदा शिरी ….१४
©️®️ डॉ.सौ. मानसी पाटील
मुंबई